"साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा...मी केलेलं भाकित सत्यात उतरतंय"; प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर रोहित पवारांची बोचरी प्रतिक्रिया 
महाराष्ट्र

"साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा...मी केलेलं भाकित सत्यात उतरतंय"; प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशावर रोहित पवारांची टीका

"भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रज्ञाताई सातव यांचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या या निर्णयाने स्व. राजीव सातव यांच्या आत्म्यास नक्कीच दुःख झालं असेल...

किशोरी घायवट-उबाळे

दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी गुरूवारी (१८ डिसेंबर) भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप प्रदेश कार्यालयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रज्ञा सातव यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. त्यांच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी अनेकदा केलेलं भाकित हळूहळू सत्यात उतरताना दिसतंय," असे म्हणत रोहित पवारांनी भाजपवर मित्रपक्षांना (शिंदेंची शिवसेना) संपवण्याची टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले, "साखरेच्या सुरीने मित्रपक्षाचा गळा कापण्यात भाजपचा हात कुणीही धरणार नाही. याच अनुषंगाने कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात उभा करण्यासाठी भाजपाने आपल्या निष्ठावंतांना अंगावरील माशी झटकावी तसं बाजूला सारलं आणि आगामी उमेदवार म्हणून प्रज्ञाताईंना पक्षात प्रवेश दिला."

प्रज्ञाताईंचा निर्णय अत्यंत दुर्दैवी

पुढे ते म्हणाले, "या घटनेवरून २०२९ मध्ये मित्रपक्षांना संपवून भाजप स्वबळावर निवडणूक लढेल, हे मी अनेकदा केलेलं भाकित हळूहळू सत्यात उतरताना दिसतंय.

"बाकी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रज्ञाताई सातव यांचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या या निर्णयाने स्व. राजीव सातव यांच्या आत्म्यास नक्कीच दुःख झालं असेल.", असेही सोशल मीडियामार्फत रोहित पवार यांनी नमूद केले आहे.

काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का

प्रज्ञा सातव यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून गटबाजीला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांचे २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाल्याने निधन झाले. राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली होती. गेल्या वर्षी त्यांना काँग्रेसने पुन्हा एकदा विधान परिषदेवर पाठवले होते.

सत्ताधारी महायुतीत बंडखोरीची चिन्हे; विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवार जाहीर

सोयाबीनच्या उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची घट; शेतकरी, व्यापारी आणि प्रक्रिया उद्योग आर्थिक संकटात

डिसेंबरपर्यंत उन्हाचे चटके बसणार! एल निनोची तीव्रता वाढणार, सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार

ज्ञानेश कुमार यांच्यावरील याचिकांवर आज सुनावणी

Mumbai : गेमचा आयडी वापरला म्हणून चाकूहल्ला; तरुण गंभीर जखमी