संग्रहित फोटो
महाराष्ट्र

विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाची ऑफर! नितीन गडकरी यांच्या वक्तव्याने खळबळ

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला विरोधी पक्षाकडून थेट पंतप्रधानपदाची ऑफर मिळाली होती, असे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

Swapnil S

नागपूर : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याला विरोधी पक्षाकडून थेट पंतप्रधानपदाची ऑफर मिळाली होती, असे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. विरोधी पक्षातील एका बड्या नेत्याकडून आपणास ही ऑफर देण्यात आली होती, मात्र केवळ विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला. पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्त्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी या तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही, असे स्पष्टीकरणही नितीन गडकरी यांनी दिले.

गडकरी यांना कोणत्या नेत्याने ही ऑफर दिली, याबाबत मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. “काही दिवसांपूर्वीची घटना आहे. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण, त्याने मला थेट ऑफर देत सांगितले की, जर तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. पण, मी त्या नेत्याला स्पष्ट सांगितले की, पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही मला पाठिंबा का द्यावा? आणि तुम्ही दिलेला पाठिंबा तरी मी का घ्यावा? पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी एखाद्या पदासाठी पक्ष आणि तत्त्वांशी कधीच प्रतारणा करणार नाही. तत्त्व हेच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती आहे,” असे सांगून गडकरी यांनी भाजप आणि राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडवून दिली आहे.

विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, “भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक नेते मला भेटण्यासाठी आले होते. चर्चा सुरू असताना मी त्यांना सहज म्हणालो, नागपूर आणि विदर्भात ए. बी. वर्धन मोठे नेते होते. त्यावर ते म्हणाले, ए. बी. वर्धन तर संघाचे विरोधक होते? त्यावर मी म्हणालो, प्रामाणिकपणे विरोध करणाऱ्यांचाही सन्मान करायला हवा. ज्याच्या विरोधात बेईमानी आहे, त्यांचा सन्मान कोण करेल, असा प्रश्न मी त्यांना केला.”

२०२४च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नितीन गडकरी यांचे नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होते. २०१९ मध्येही त्यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत होते. मात्र, त्यावेळी गडकरींनीच नरेंद्र मोंदी यांना पाठिंबा दिला. २०२४मध्ये केंद्रातील सरकार अल्पमतात असल्यामुळे त्यांना नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाची मदत घ्यावी लागली आहे. या दोन पक्षांच्या पाठिंब्यावर असलेल्या या सरकारला काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाला मोठा अर्थ प्राप्त झाला आहे.

गडकरी हे सत्तेतील हुकूमशाहीविरोधात - राऊत

“नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वमान्य असे नेते आहेत. पंतप्रधानपदासाठी तडजोड करा, असे त्यांना कोणी सांगितले असेल, असे मला वाटत नाही. मुळात या देशात हुकूमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे. १० वर्षांपासून ज्याप्रकारे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्याशी तडजोड करू नका, अशी भूमिका विरोधी पक्षातील नेत्याने त्यांच्याकडे मांडली असेल तर त्यात काही चुकीचे आहे असे मला वाटत नाही. नितीन गडकरी या सगळ्याच्या विरोधात बोलत राहिले, आपला आवाज मांडत राहिले. म्हणूनच त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या नेत्याने सल्ला दिला असेल तर फारसा त्रास होण्याचे कारण नाही,” असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्याची देशाला गरज आहे. ते जर प्रधानमंत्री झाले तर आम्हाला आनंद होईलच. एक मराठी माणूस एवढ्या मोठ्या पदावर बसेल. नितीन गडकरी यांचे कर्तृत्वसुद्धा खूप मोठे आहे आणि ते गलिच्छ राजकारण करत नाहीत. सत्तेसाठी त्यांनी कधी आपली भूमिका बदलली नाही, ही त्यांची खासियत आहे. त्यांचे मन खूप मोठे आहे. विकासात ते कधीच राजकारण करत नाहीत.”

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

संजय राऊत मानहानी प्रकरण : नारायण राणेंना धक्का; समन्स रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

NATO ची भारत, चीन, ब्राझीलला धमकी; रशियाशी व्यापार थांबवा, अन्यथा १०० टक्के टॅरिफ

फडणवीस-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगली जुगलबंदी; आमच्यासोबत सत्तेत या! मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर