पुणे : येथील सदाशिव पेठेतील टपरीवर चहा पिण्यासाठी उभ्या असलेल्या १३ विद्यार्थ्यांना एका कारने शनिवारी सायंकाळी उडवले. या अपघातात १३ विद्यार्थी जखमी असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. कारचालक जयराम शिवाजी मुळे (वय २७) याला विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेतील जखमींना पुण्यातील संचेती व मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पुण्यातील भावे हायस्कूल जवळ हा भीषण अपघात घडला आहे. भावे हायस्कूल जवळ एक चहाचे दुकान आहे. या चहाच्या दुकानावर चहा पिणाऱ्यांना उडवले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जेव्हा अपघात घडला तेव्हा या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहनाच्या अॅक्सिलेटरवर दाब पडला. त्यामुळे कारचा वेग वाढला. अनियंत्रित झालेल्या कारने या चहाच्या दुकानसमोर पार्क केलेल्या गाड्या आणि तिथे असलेल्या लोकांना धडक दिली. यापैकी काही विद्यार्थ्यांची उद्या परीक्षा आहे. जयराम मुळे याला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले आहे प्राथमिक चौकशी कार चालकाने मद्य सेवन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी दिली.