पुणे : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील रांजणखळगे पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी रविवारचा दिवस ‘घातवार’ ठरला. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल क्षमतेपेक्षा अधिक भारामुळे कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून, १८ जण गंभीर जखमी झाले, तर ३८ जणांना वाचवण्यात एनडीएआरएफच्या पथकाला यश आले आहे. या आपत्तीत अनेक जण नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेल्याची भीती असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत तातडीने सर्व शासकीय यंत्रणा घटनास्थळी रवाना केली. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
दरवर्षी पावसाळ्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारो नागरिक तळेगाव येथील कुंडमळा येथे भेट देतात. नेहमीप्रमाणेच रविवारीही शेकडो नागरिक कुंडमळा येथे पर्यटनासाठी आले होते. गेले काही दिवस सातत्याने पाऊस होत असल्याने इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. शेलारवाडी ते कुंडमळा या दोन गावांना जोडणारा एक पूल आहे. हा पूल किमान ४० ते ५० वर्षे जुना असल्याचे सांगण्यात येते. पूर्वी हा पूल संपूर्णपणे लोखंडी ढाच्याचा होता. गेल्या काही वर्षांत पुलाच्या दोन्ही बाजूच्या काही भागाचे सिमेंट बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, पुलाचा मध्यभाग हा लोखंडीच होता. पर्यटनाला आलेल्या काही नागरिकांनी आपल्या दुचाकी या पुलावर घातल्या, तर काही पर्यटक पुलावर उभे होते. क्षमतेपेक्षा अधिक भार झाल्याने अचानक मोठा आवाज झाला आणि हा लोखंडी पूल कोसळला.
पूल कोसळल्यानंतर पुलावरील सर्व पर्यटक आणि त्यांच्या दुचाकी नदीच्या प्रवाहात पडल्या. काही पर्यटक लोखंडी पुलाच्या साच्याखाली अडकले. त्यामुळे त्यांचा जागीच पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर काही पर्यटक पुराच्या पाण्यासोबत वाहून गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शासकीय यंत्रणेकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, अंदाजे १०० पर्यटक या पुलावर होते. सदर दुर्घटनेत एकूण ३८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी १८ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने सोमाटणे फाटा, ता. मावळ येथील पवना रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल आदी रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान ४ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची २ पथके, आपदा मित्र, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक व स्थानिक मदत बचाव संस्था इत्यादी घटनास्थळी दाखल झाले असून, मदतकार्य सुरू आहे.
पुलाचा सांगाडा उचलण्याचे आव्हान
या दुर्घटनेत लोखंडी पुलाचा संपूर्ण सांगाडा नदीत कोसळला. पुलावर दुचाकी तसेच चालत असणारे अनेक पर्यटक नदीत कोसळले. काही पर्यटक या पुलाच्या सांगड्याखाली अडकल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर प्रशासनाने चार मोठ्या क्रेन बोलावून सांगाडा काढण्याचा प्रयत्न चालवला. मात्र, नदीचे पाणी, पात्रातील खडक आणि जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत होते.
नातवाईकांचा आक्रोश...
कुंडमळा येथे वर्षा सहलीसाठी अनेक पर्यटक सहकुटुंब आले होते. यातील अनेक नागरिक आपली पत्नी, मुलांना निसर्गसौंदर्य दाखविण्यासाठी दुचाकीवरून नदीच्या पुलावर गेले. त्यावेळी त्यांचे नातेवाईक फोटो काढत होते. त्यातच अचानक पूल कोसळला आणि होत्याचे नव्हते झाले. पूल कोसळल्याचे पाहताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. कुणाचा मुलगा, कुणाची सून, कुणाचा नातू पुलावर होते. ‘ते खाली पडले आहेत, अजून सापडले नाहीत, त्यांना वाचवा, त्यांना शोधा’, अशी आर्त हाक नातेवाईक देत होते.
बचावकार्य सुरू, अनेक नेत्यांची घटनास्थळी धाव
या दुर्घटनेची माहिती समजताच मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, रघुवीर शेलार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व मदत, बचाव कार्य सुरू केले. दुर्घटना घडल्यानंतर या ठिकाणी परिसरातील नागरिकदेखील मोठ्या प्रमाणात दाखल झाले. त्यामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती. परिणामी, मदत कार्यात काहीसा अडथळा निर्माण होत होता. त्यातच पावसाच्या सरीही सुरू होत्या. अंधार पडल्यानंतरही बचाव कार्य सुरूच ठेवण्यात आले होते.
अपघातग्रस्तांच्या दु:खात आम्ही सहभागी - मुख्यमंत्री
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा - एकनाथ शिंदे
इंद्रायणी पूल दुर्घटनेनंतर राज्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्यातील जुन्या धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतानाच जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. पर्यटनस्थळी विशेषत: सुटीच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा तत्पर ठेवावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. तसेच या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर
हा पूल धोकादायक असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता व तो दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा मंत्री गिरीश महाजन यांनी केली.