मुंबई : २०१२ मध्ये पुण्यातील जेएम रोडवर झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने दणका दिला. आरोपीने १३ वर्षे तुरुंगवास भोगला असला तरी आता खटला सुरू झाला आहे. तसेच गुन्ह्याचे स्वरूप गंभीर आहे. अशा परिस्थितीत आरोपीला जामिनावर सोडता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीचा अर्ज फेटाळला.
बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेल्या असद खानने जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती. त्याच्या अर्जावर विशेष न्यायाधीश शायना पाटील यांनी निर्णय दिला. आरोपी खानवर खटला चालवला जात असलेल्या गुन्ह्याचे गंभीर स्वरूप, गुन्ह्यातील खानची सक्रिय भूमिका तसेच आरोपींविरुद्ध सरकारी पक्षाने गोळा केलेल्या पुराव्यांचे स्वरूप आणि गुणवत्ता यांचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच १३ वर्षांच्या दीर्घ तुरुंगवासाच्या पैलूंचा विचार केला जाईल, असे विशेष न्यायाधीश शायना पाटील यांनी स्पष्ट करून खानला जामीन मंजूर करण्यास स्पष्ट नकार दिला.
खानवरील आरोप गंभीर आहेत. त्याने तुरुंगात घालवलेला बराच काळ हा जामिनावर सोडण्याचा एकमेव आधार असू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
प्रकरण काय?
१ ऑगस्ट २०१२ रोजी पुण्यातील जेएम रोडवर पाच कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट झाले होते. त्यात एका व्यक्तीला दुखापत झाली होती. हा बॉम्बस्फोट घडवण्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून खानबरोबर नऊ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले असून खटला सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत आरोपीला जामिनावर सोडता येणार नाही, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले.