पोलीस भरती चाचणीत २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; खाकी वर्दीचं स्वप्न अधुरंच 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Pune : पोलीस भरती चाचणीत २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; खाकी वर्दीचं स्वप्न अधुरंच

पुण्यात सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याची मैदानी चाचणी देत असताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

Swapnil S

पुण्यात सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान धावण्याची मैदानी चाचणी देत असताना एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पुरुषोत्तम बारकुल (रा. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून ही घटना शनिवारी सकाळी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घडली.

पुणे शहर पोलीस दल आणि कारागृह विभागातील रिक्त पदांसाठी गेल्या महिन्याभरापासून भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शनिवारी सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास पुरुषोत्तम बारकुल हा १६०० मीटर धावण्याच्या चाचणीसाठी मैदानात उतरला होता. पोलीस भरतीमधील ही चाचणी अत्यंत कठीण मानली जाते. पुरुषोत्तमने मैदानाच्या दोन फेऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या होत्या, मात्र तिसऱ्या फेरीदरम्यान त्याला अचानक भोवळ आली.

काही प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, तो चौथ्या फेरीच्या तयारीत असताना त्याला प्रचंड दम लागला आणि छातीत कळ आल्याने तो धावतानाच मैदानावर कोसळला.

मैदानावर हा प्रकार घडताच तेथे असलेल्या पोलीस उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने तातडीने पुरुषोत्तमच्या दिशेने धाव घेतली. वैद्यकीय पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली असता त्याचे हृदयाचे ठोके अत्यंत मंद झाल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने रुग्णवाहिकेने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

प्राथमिक अंदाजानुसार, धावताना हृदयविकाराचा झटका आल्याने पुरुषोत्तमचा मृत्यू झाला असावा, असे सांगण्यात येत आहे.

मैदानावर उपस्थित असलेल्या त्याच्या मित्रांनी सांगितले की, सध्या उन्हाचा तडाखा वाढला असून उन्हामुळे आलेला थकवा आणि दम यामुळे ही दुर्घटना घडली असावी. पुरुषोत्तमने पोलीस भरतीसाठी मोठी तयारी केली होती, मात्र त्याचे खाकी वर्दीचे स्वप्न अधुरेच राहिले. या घटनेची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय बुलढाण्यावरून पुण्याकडे रवाना झाले असून पोलीस दलात आणि उमेदवारांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आता पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अहवालातून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण

टाळेबंदीची अफवा पसरवणारे देशद्रोही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला कडक कारवाईचा इशारा

आजचे राशिभविष्य, २९ मार्च २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Mumbai : वीकेंडला ट्रेनने प्रवास करताय? आधीच जाणून घ्या वेळापत्रक; उद्या 'या' मार्गावर २१ तासांचा मेगाब्लॉक

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; फ्लाइट्स कधी आणि कोणत्या मार्गांवर सुरू होणार? जाणून घ्या सविस्तर