(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

राहुल गांधी यांची आज भंडाऱ्यात सभा

भाजपच्या पाठोपाठ काँग्रेसनेही विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावला आहे.

Sagar Sirsat

प्रतिनिधी/मुंबई : भाजपच्या पाठोपाठ काँग्रेसनेही विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. विदर्भात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत भंडारा येथे शनिवारी काँग्रेसची पहिली प्रचारसभा पार पडेल. तर दुसऱ्या दिवशी नागपूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची सभा होणार आहे.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रथमच वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा होत असल्याने त्या यशस्वी करण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी जोर लावला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली या पाच मतदारसंघांत येत्या १९ एप्रिलला मतदान होत आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रचाराची सांगता १७ एप्रिलला संध्याकाळी पाच वाजता होईल. प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने काँग्रेसने भाजप आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात रान उठविण्यासाठी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा विदर्भात झाल्या आहेत. आता काँग्रेस प्रचार सभांच्या माध्यमातून भाजपला उत्तर देण्यासाठी सज्ज झाला आहे.

राहुल गांधी शनिवारी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ दुपारी तीन वाजता भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील गजानन महाराज मंदिराच्या मैदानात जाहीर सभा घेती. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

तर काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, रविवार, १४ एप्रिल रोजी नागपुरातील गोळीबार चौकात आयोजित प्रचार सभेला संबोधित करणार आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा दुपारी चार वाजता होईल. या सभेच्या आधी खर्गे हे सकाळी दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश