धनंजय कवठेकर/ रायगड
राजकारणात संधी मिळेल तिथे आपल्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकीपर्यंत ही पद्धत सामान्य आहे. आता ही परंपरा नगरपालिका निवडणुकांमध्येही दिसून येत आहे आणि रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांमध्ये लेकी-सुना या नव्या चेहऱ्यांनी रिंगणात उतरले आहे.
रायगडचे राजकारण नेहमीच चर्चेत राहिले आहे. सध्या शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादामुळे राजकीय वातावरण तापले असून, पालकमंत्रिपदाच्या वादापासून सुरू झालेली चर्चा आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पक्षांतरांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे रायगडातील घडामोडी राज्यभर चर्चेचा विषय बनल्या आहेत. जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक नेत्यांनी आपल्या वारसांना राजकीय पटलावर उतरवण्याची संधी साधली आहे. यावेळी विशेष म्हणजे दोन लेकी आणि दोन सुना अशी चार तरुणी सरळ राजकीय मैदानात उतरल्या असून त्यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. परिवाराचा राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या या नव्या चेहऱ्यांपैकी कोण बाजी मारणार, कोण मतदारांना आकर्षित करणार आणि कोण पुढील स्थानिक नेतृत्व बनेल? याकडे रायगडसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महिला उमेदवारांच्या प्रचाराचा धुमधडाका
अलिबागमध्ये माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांची कन्या अक्षया नाईक, मुरूडमध्ये माजी नगराध्यक्ष मंगेश दांडेकर यांची कन्या आराधना नाईक निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. पेणमध्ये आमदार रवींद्र पाटील यांची सून प्रीतम पाटील यांच्यावर प्रचाराची धुरा आहे, तर कर्जत येथे माजी आमदार सुरेश लाड यांची सून डॉ. स्वाती पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.