महाराष्ट्र

५ जुलैचा विजयी मेळावा वरळीत; 'सामना'तून ठिकाण जाहीर; राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार!

विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे, असेही 'सामना'त म्हटले आहे.

Krantee V. Kale

मुंबई : मनसे व शिवसेनेच्या (उबाठा) विरोधानंतर हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केली. त्यानंतर मराठी माणसाचा लढा, एकजूट यामुळे शासन निर्णय रद्द करण्यात आला असून मराठी माणसाचा विजयत्सोव येत्या ५ जुलै रोजी साजरा करण्यात येईल, असे मनसे आणि शिवसेनेने (उबाठा) जाहीर केले. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. राज्य शासनाने हिंदी सक्तीवरून माघार घेणे ही मराठी माणसाच्या एकजुटीची शक्ती असल्याचे दोन्ही ठाकरेंनी नमूद केले आहे.

विजयी मेळावा दादर की वरळी येथे होणार याबाबत अनिश्चितता होती. मात्र, त्याबाबतचे चित्रही आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे मुखपृष्ठ 'सामना'मधून मेळावा वरळी येथील डोम सभागृहात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मेळाव्याला राज आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असून मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे, असेही सामनात म्हटले आहे. ‘मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रचंड विजय’ असे संबोधत, ५ जुलैला ‘मराठी विजय दिवस’ साजरा केला जाणार असल्याचे नमूद केले आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मनसे-शिवसेना (उबाठा) मनोमिलनसाठी एक पाऊल पुढे टाकले. राज ठाकरे यांनी साद घातली आणि उद्धव ठाकरे यांनीही टाळी दिली. त्यानंतर मनसे- शिवसेना युतीचे संकेत मिळत आहेत. मात्र मध्यंतरीच्या काळात युतीबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. यातच शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा आला आणि मनसे शिवसेना पुन्हा एकदा एकत्र महायुती विशेष करून भाजपच्या विरोधात मैदानात उतरले. हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करण्यासाठी ५ जुलैला मोर्चाची हाक दिली. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. परंतु मनसे व शिवसेनेने विजयोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षातील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. या मेळाव्यात राज आणि उद्धव एकाच व्यासपीठावर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून ठाकरेंच्या संभाव्य युतीबाबतही जोरदार चर्चा सुरू आहेत.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता: जुळ्या बोगद्यांच्या बांधणीचा मार्ग मोकळा

दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच, मुंबई पोलीस ठाम ; भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला निर्देश