जळगाव : जिल्ह्याला लाभलेले मंत्री हे मतदारांच्या अपेक्षा आकांक्षा पूर्ण करणारे असले पाहिजेत अन्यथा जनता या नेत्यांना आम्हाला गृहीत धरू नका, असा संदेश मतदानातून देत असते. नगरपालिका निवडणुकीत नेमके हेच झाले. जळगाव जिल्ह्यातील तीन मंत्र्यांची प्रतिष्ठा मतदारांनी पार धुळीस मिळवली, कारण त्यांनी दिलेले उमेदवार हे मतदारांनी साफ नाकारले. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, जिल्ह्याचे पालक मंत्री गुलाबराव पाटील आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांना सतत आपल्याला गृहीत धरू नका हा संदेश मतदारांनी दिल्याने यांची प्रतिष्ठा ही पाण्यात गेली.
धरणगाव हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील गाव. गुलाबरावांचा एक पाय सतत धरणगावात असतो. यामुळे गाव आपल्या शब्दाबाहेर नाही हा त्यांचा गोड गैरसमज. वैशाली भावे या उमेदवारास जनविकास आघाडीच्या माध्यमातून उभे केले गेले. गुलाबरावांचा त्यांना पाठिंबा होता. तर धरणगाव विकास आघाडीने लीलाबाई चौधरी यांना नगराध्यक्षपदासाठी उभे केले या लढतीत लीलाबाई चौधरी या विजयाी झाल्या. शहरात न झालेली विकासकामे, धरणगावाला असलेल्या पाण्याच्या समस्येमुळे मतदारांचा गुलाबरावांवर राग आहे. या रागाचे पर्यावसान मतदानात झाले आणि पालकमंत्र्यांना मतदारांनी जमिनीवर आणले. शहरात विकास घडवून आणायचा असेल तर भाजपाची साथ हवी हे ओळखलेल्या लिलाबाई उद्या शहराच्या विकासासाठी भाजपाचे बोट धरू शकतात.
रक्षा खडसे मुक्ताईनगर मतदारसंघात केवळ चार नगरसेवक निवडून आणू शकल्या तर नगराध्यक्ष म्हणून शिंदे सेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कन्या संजना पाटील या रक्षा खडसे यांनी उभ्या केलेल्या उमेदवारा विरोधात २४३६ मतांनी निवडून आल्या. या निवडणुकीच्या प्रचारात ही आमच्या दोन परिवाराची लढाई असल्याचे विधान एकनाथ खडसे यांनी केल्याने त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे मंत्री गिरीश महाजन सांगतात तर भाजपाने आपल्याला साथ दिली नाही, असे रक्षा खडसे यांचे म्हणणे आहे. कोणाचे काय म्हणणे आहे हे दूर ठेवले तरी आज रक्षा खडसे यांचा करिष्मा मुक्ताईनगरात चालला नाही हे सत्य आहे.
भुसावळला वस्त्रोदयोग मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. त्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या होत्या. ही जागा अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाली आणि निवडणुक जाहीर होताच संजय सावकारे यांनी माध्यमावर एक पोस्ट टाकत पत्नीचे अभिनंदन केले. या उतावळेपणाचा फटका त्यांना बसला. कारण ही जागा सावकारे यांनी मॅनेज केली असल्याचा संदेश गेला. खडसे यांनी सावकारे यांना राजकारणात पुढे आणले भाजपाचे तिकीट देऊन आमदार केले. याच सावकारेंविरोधात माजी आमदार संतोष चौधरी आणि एकनाथ खडसे हे मैदानात उतरले. सामाजिक समीकरण झाले. सावकारेंसाठी मुख्यमंत्र्यांनी भुसावळला सभा घेतली. सभेनंतर संजय सावकारेंचा आत्मविश्वास वाढला पण हा अतिआत्मविश्वास नडला आणि रजनी सावकारे यांना पराभवाची चव चाखावी लागली.
जामनेरमध्ये मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या पत्नी साधना महाजन यांना बिनविरोध निवडून आणले. जामनेर शहरच नव्हे तर मतदारसंघ आपल्या शब्दाबाहेर नाही हे दाखवून दिले. येथे भाजपाचे २२ नगरसेवक निवडून आहेत. पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी पत्नी सुनिता पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली तर भाजपाने माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता पाटील यांना उमेदवारी दिली होती. या जागेकडे जिल्ह्याचे लक्ष होते यात किशोर पाटील यांनी सुनिता पाटील यांना सहज निवडून आणले.
या निवडणुकीत १८ नगराध्यक्षांच्या जागेमध्ये महायुतीला १६ जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला दोन जागा मिळाल्या .यात काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही तर उबाठा आणि शरद पवार गट यांना प्रत्येकी जागा मिळाल्याने महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ झाला.
रक्षा खडसे यांना अतिआत्मविश्वास नडला
मुक्ताईनगर मतदारसंघ हा एकनाथ खडसेंचा. या मतदारसंघात दरवेळी विधानसभेची निवडणूक ही चंद्रकांत पाटील विरुद्ध एकनाथ खडसे अशी होते. मुक्ताईनगर मतदारसंघ आपल्या शब्दाबाहेर नाही, ही एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांची भावना. हा अतिआत्मविश्वास रक्षा खडसे यांना भोवला.