मुंबई : बदलापूरमध्ये चिमुकलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभर अस्वस्थता व संतापाची लाट पसरलेली असताना राज्यात बलात्काराचे सत्र सुरूच आहे. मुंबईत मालवणी येथे अल्पवयीन मुलीवर पित्याने अत्याचार केल्याची घटना घडली, तर अंबरनाथमध्ये सार्वजनिक शौचालयामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. पुण्यातील दौंड तालुक्यात एका शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघड झाला आहे. तसेच कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मालवणीत मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्याला अटक
मालाडच्या मालवणी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर तिच्या ५५ वर्षीय पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. याप्रकरणी आरोपी पित्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारासह ‘पोक्सो’ कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यात त्याला विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंबरनाथमध्ये शौचालयात अल्पवयीन मुलीवर बलात्कार
अंबरनाथमध्ये एका ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरासमोरील सार्वजनिक शौचालयात तिच्या शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाने अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ, पश्चिम पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचार आणि ‘पोक्सो’ कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. संतोष कांबळे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे हा लैंगिक अत्याचाराचा प्रकार १ जुलै ते २० ऑगस्टपर्यंत सुरू होता.
पुण्यात शिक्षकाकडून नववीतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामध्ये एका शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघड झाली आहे. बापूसाहेब धुमाळ असे या शिक्षकाचे नाव असून तो दौंड तालुक्यातील मळद येथील भैरवनाथ विद्यालयामध्ये शिक्षक आहे. यासंदर्भात पालकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक विद्यार्थिनींचे अश्लील फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांचे लैंगिक शोषण करीत असे. एका पीडित मुलीने हा प्रकार आपल्या वडिलांना सांगितल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
कोल्हापुरात दहा वर्षीय मुलीची हत्या, बलात्काराचा संशय
कोल्हापुरात शिये गावातील रामनगर परिसरात दहा वर्षीय मुलीचा मृतदेह गुरुवारी गावालगतच्या शेतात आढळला. मृत मुलगी बुधवारपासून बेपत्ता होती. या मुलीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर मुलीचा मृतदेह सापडला तेव्हा तिच्या अंगावर ड्रेस होता, पण चप्पल व तिची अंतर्वस्त्र बाजूला पडली होती. त्यामुळे तिची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.