महाराष्ट्र

रश्मी शुक्ला पुन्हा येणार; नवीन पोलीस महासंचालक केवळ निवडणुकीपुरतेच!

ही उचलबांगडी केवळ निवडणुकीपुरतीच असल्याचे राज्याच्या गृह खात्याच्या आदेशानुसार स्पष्ट होत आहे. रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून विधानसभा निवडणूक संपल्यानंतर महायुतीचे सरकार आल्यास त्या पुन्हा पोलीस महासंचालकपदी बसू शकतील.

Swapnil S

मुंबई : विरोधी पक्षांनी मागणी केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची उचलबांगडी केली. ही उचलबांगडी केवळ निवडणुकीपुरतीच असल्याचे राज्याच्या गृह खात्याच्या आदेशानुसार स्पष्ट होत आहे. रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून विधानसभा निवडणूक संपल्यानंतर महायुतीचे सरकार आल्यास त्या पुन्हा पोलीस महासंचालकपदी बसू शकतील, अशी चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, संजयकुमार वर्मा यांची मंगळवारी नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती २०२८ पर्यंत असेल, अशा बातम्या आल्या. पण, वर्मा यांचा कालावधी केवळ निवडणुकीपुरता असेल. कारण राज्याच्या गृह खात्याच्या आदेशात स्पष्ट केले आहे की, रश्मी शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. वर्मा हे केवळ विधानसभा निवडणुकीपुरते पोलीस महासंचालक असतील. शुक्ला यांचा कार्यकाळ संपला आहे आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर त्यांना पदावरून हटवल्यानंतर त्या निवृत्त होतील, असा समज होता.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन पोलीस महासंचालक पदासाठी राज्य सरकारकडून राज्यातील तीन ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची नावे मागवली होती. त्यातील संजयकुमार वर्मा यांच्या नावाला मान्यता देण्यात आली. त्यांची सेवानिवृत्तीची चार वर्षे शिल्लक असल्याने ते २०२८ पर्यंत या पदावर कायम राहू शकतात. पण, राज्याच्या गृह खात्याने मंगळवारी काढलेल्या आदेशात वर्मा यांची नियुक्ती केवळ विधानसभा निवडणुकीपुरती असल्याचे स्पष्ट होत आहे. संजयकुमार वर्मा हे १९९० च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. निवडणुकीनंतर वर्मा हे आपला पदभार रश्मी शुक्ला यांच्याकडेच सुपूर्द करण्याची शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमानंतर काय होणार, याबाबत सरकारी आदेशात गुप्तता पाळण्यात आली आहे. कदाचित संजयकुमार वर्मा हे आपल्या मागील पदावर पुन्हा जातील. त्यांच्याकडे पोलीस महासंचालक (कायदा व तांत्रिक) असा पदभार होता.

दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात निवडणूक आयोगाचे सचिव एस. के. दास म्हणाले, आयोगाने तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनेलचे पुनरावलोकन केले आहे. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदासाठी संजयकुमार वर्मा यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे. वर्मा यांच्यासोबतच संजीव कुमार सिंघल व रितेश कुमार यांचीही नावे महासंचालक पदासाठी शर्यतीत होती. दरम्यान, मुंबई माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह म्हणाले की, शुक्ला यांची उचलबांगडी करणे हे ‘दुर्दैवी’ आहे. त्यांना पदावरून हटवण्यासाठी काँग्रेसने कोणताही पुरावा दिलेला नाही.

संजयकुमार वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक

भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असून सध्या ते महासंचालक-कायदेशीर आणि तांत्रिक पदावर कार्यरत होते. एप्रिल २०२८ मध्ये वर्मा यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे.

राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून सोमवारी निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरून उचलबांगडी करण्याचे आदेश दिले होते. विरोधी पक्षांनी शुक्ला यांच्याबद्दल तक्रारी केल्या होत्या. शुक्ला या राज्यातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या. आता वर्मा यांची पोलीस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून वर्मा हे पदभार स्वीकारणार आहेत. शुक्ला यांची उचलबांगडी केल्यानंतर पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार फणसाळकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता.

ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे (एसआयटी) वर्मा हे प्रमुख होते.

आयोगाकडून वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब

निवडणूक आयोगाने तीन जणांच्या नावांची शिफारस करण्याचे आदेश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले होते. त्यानुसार पाठविण्यात आलेल्या नावांचा विचार करून निवडणूक आयोगाने संजयकुमार वर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी