मुंबई : उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. वायकरांच्या खासदारकीला आव्हान देणारी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांची याचिका न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी फेटाळून लावली. सहा महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिमच्या जागेवर ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर आणि शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यात लढत रंगली होती. या चुरशीच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी पराभवाचा धक्का दिला होता. वायकरांनी अवघ्या ४८ मतांनी ही निवडणूक जिंकली होती, पण या निवडणूक निकालावर अमोल कीर्तीकर यांनी आक्षेप घेतला होता.
वायकर यांना ४,५२,६४४, तर कीर्तीकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली. मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांकडून अनेक गंभीर चुका झाल्या, ज्यामुळे निवडणूक निकालांवर परिणाम झाला. खऱ्या मतदारांच्या जागी ३३३ बनावट मतदारांनी दिलेली मते चुकीच्या पद्धतीने स्वीकारण्यात आली, असे कीर्तीकर यांच्या याचिकेत म्हटले आहे.
अमोल कीर्तीकर यांनी याचिकेची मांडणी योग्यरीत्या केलेली नाही. तसेच टेंडर मते ही विजयी उमेदवाराला कशी मिळाली, हे दाखविण्यात कीर्तीकर अपयशी ठरले. त्यामुळे, त्यांची याचिका फेटाळून लावावी, असा दावा रवींद्र वायकर यांच्या वतीने करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय गुरुवारी जाहीर करताना अमोल कीर्तीकर यांची याचिका फेटाळून लावली.