अकोला : देशातील व राज्यातील कृषी विज्ञान केंद्रात संशोधनाच्या नावाने ठणठणाट असून ती केवळ भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पगार खाण्यासाठीच बसली आहेत, असा आरोप राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील हे अकोला कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीसाठी आले होते. राज्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यभारावर अनेक स्तरातून टीका होत आहे. त्यातून कृषीसाठी फायदेशीर काही संशोधन होत नसल्याची टीका सातत्याने होत आहे. आता राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही कृषी विज्ञान केंद्रांच्या व्यवस्थेवर जोरदार टीका केली. या ठिकाणी संशोधनाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचे ते म्हणाले.
सुजयच्या उमेदवारीबद्दल पक्षच निर्णय घेईल!
सुजय विखे यांच्या संगमनेरमधून उमेदवारीबद्दल पक्षच निर्णय घेईल. पक्षाने अद्यापही कुठलीच उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे सुजय आणि मला त्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. सुजय विखेंच्या उमेदवारीवरून पक्ष जो निर्णय घेईल त्यानुसार पाहू. सुजय हा जिल्ह्याचा खासदार राहिला आहे. पक्षाने त्यांना आदेश दिल्यास तो पाळावा लागेल, असे विखे-पाटील म्हणाले.