मुंबई : मुंबईसह राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरनंतर उन्हाच्या तडाख्यामुळे लोकांचा घामटा निघाला. सूर्य आग ओकत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील पारा ४० अंश सेल्सिअस पार गेला. उन्हामुळे उष्णता विकार आजाराचा प्रसार वाढला आहे. या उष्णतेचा फटका राज्याला बसला असून उष्माघातामुळे राज्यात ८ मार्चपर्यंत ४ जण बाधित झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. दरम्यान, हिट वेमुळे राज्यात २०२३ मध्ये १४ तर २०२४ मध्ये १ जणांचा मृत्यू झाला.
गेल्या काही वर्षांत जगभरातील तापमानात बदल जाणवू लागला आहे. उष्माघाताचे आजार वाढले आहे. उष्माघात हा एक प्रकारे गंभीर आजार आहे. शरिराचे तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक वाढले तर ते सुर्याच्या गरमीपुढे सामान्य पातळी ठेवणे अशक्य होते. त्यामुळे राज्यात उष्णता विकार प्रतिबंध व नियंत्रणासाठी राज्यात विविध पातळीवर दरवर्षी १ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत उपाययोजना करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येतो.
फेब्रुवारी अखेर नंतर राज्यातील तापमानात वाढ होत आहे. मुंबईत ही पारा ३५.४ अंश सेल्सिअसवर गेल्याने मुंबईकर हैराण झाले. राज्यातील अनेक जिल्ह्यांतील तापमानात वाढ झाल्याने उष्णता विकाराचे आजार वाढले. राज्यात १ ते ८ मार्च दरम्यान ४ जण बाधित झाले आहेत.
गरमीच्या लाटेचा परिणाम आरोग्यावर होऊन त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. तापमान जास्त वाढल्यास उष्णता डिहायड्रेशन उष्माघात आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. उष्णतेपासून आपले संरक्षण सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन संचालक हिवताप हत्ती रोग व जलजन्य आजार) डॉ. बबिता कामलापूरकर यांनी केले आहे.
हे करा
पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा.
हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
उन्हात जाताना टोपी/ हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.
पाळीव प्राण्यांना सावलीत थंड ठिकाणी ठेवा.
ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
करू नका
शक्यतो उन्हाच्या वेळेत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
कष्टाची कामे उन्हात करू नका.
पाक केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
गडद रंगाचे तंग कपडे वापरू नका.
उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाकघर हवेशीर ठेवा.