पुणे : पुण्यातील बहुचर्चित प्रांजल खेवलकर ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) पक्षाच्या प्रदेश महिलाध्यक्ष रोहिणी खडसे यांना नोटीस बजावून त्यांचा जबाब नोंदवला. अमली पदार्थविरोधी विभागाकडून त्यांची सुमारे दीड तास चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे, ही नोटीस बजावली जाण्यापूर्वीच प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे समोर आले आहे.
रोहिणी खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही चौकशी सुमारे दोन महिन्यांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात होती, असे सांगितले. चौकशीदरम्यान पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरे दिली आहेत. चौकशीचा तपशील माध्यमांना सांगण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. "ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे आणि त्या संदर्भातली चर्चा मीडियासमोर करणे योग्य होणार नाही," असे त्या म्हणाल्या. तसेच, त्यांनी पोलिसांना संपूर्ण सहकार्य करत असल्याचे नमूद केले. चौकशीत सीम कार्ड बदलणे आणि पुरावा नष्ट करणे या संबंधित विषयांवर चर्चा झाली. रोहिणी खडसे यांनी कथितरित्या जुने सिम कार्ड हरवल्याचे सांगून दुसरे सिम कार्ड घेतले आणि व्हॉट्सॲपचा डेटा डिलीट केला होता. हे कृत्य पुरावा नष्ट करण्याच्या निष्कर्षांत आले होते. रोहिणी खडसे यांनी त्यांचे पती प्रांजल खेवलकर निर्दोष असल्याचा पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या, "प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, आणि सर्व आरोपींचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत. त्यांनी कुठल्याही अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही." त्यांनी दावा केला की, डॉ. प्रांजल खेवलकर यांनी कधीही अमली पदार्थांचे सेवन केलेले नाही आणि भविष्यातील न्यायालयीन लढाईत ते या केसमधून बाहेर पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकरणाच्या आरोपपत्रामध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप दाखल झालेला नाही. आरोपपत्रानुसार, आरोपींवर केवळ अमली पदार्थांच्या 'पजेशन'चा (ताब्यात ठेवणे) आरोप करण्यात आला आहे. हा विषय न्यायालयीन लढाईचा भाग असून, न्यायालयात सत्य बाहेर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
माध्यमांना कळकळीची विनंती
रोहिणी खडसे यांनी या संपूर्ण प्रकरणावर माध्यमांनी आता चर्चा थांबवावी, अशी कळकळीची विनंती केली. "हा आमच्या परिवाराचा विषय आहे. माझ्या दोन लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की आता या विषयावर आपणही चर्चा थांबवावी, कारण या सगळ्या गोष्टीचा त्या दोघांच्या भविष्यावरती कुठेतरी परिणाम व्हायला लागतोय," अशी भावनिक विनंती त्यांनी केली. न्यायालयीन लढाई आपण नक्की जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.