मुंबई : परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या संपामुळे परिवहन विभागातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय निर्णयामुळे प्रशासनात सेवाविषयक प्रशासकीय गुंतागुंत निर्माण झाली आहे. महसूल विभागीय बदल्यांचे धोरण रद्द न करणे, विभागीय परीक्षेसारख्या संवेदनशील क्षेत्रात अनेक बदल करण्यात आले आहेत. आकृतिबंधाची सुयोग्य अंमलबजावणी न करणे, कामकाजात सुसुत्रीकरण येण्यासाठी नेमण्यात आलेल्या कळसकर समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी न करणे, विभागीय स्तरावरील आस्थापना विषयक, सेवा ज्येष्ठता व बदल्यांचे संयोजन याबाबत कोणतीही कर्मचारीभिमुख सकारात्मक कार्यवाही न झाल्यामुळे संघटनेने परिवहन आयुक्तांबरोबर चर्चा केली. मात्र या चर्चेतून सकारात्मक उत्तर मिळू न शकल्याने संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे.
परिवहन आयुक्तांना संपाची नोटीस
त्याप्रमाणे राज्यातील आरटीओ कर्मचाऱ्यांनी २४ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार केला आहे, असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. या संपाची परिवहन आयुक्त व अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन) यांना संघटनेने नोटीस दिली आहे.