वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून विरोधी पक्षाने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्य क्षमतेवर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी योग्य कारवाई केली नाही. तसेच राजेंद्र हगवणे यांना वाचवण्याचे काम रूपाली चाकणकर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. परंतु, या टीकेवर उत्तर देताना रूपाली चाकणकर यांनी मी चिल्लर टीकांकडे लक्ष देत नाही असे उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्यावर आरोप करत म्हटले की, सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत. त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये. कारण त्याचा फरक थेट महिलांवरील प्रश्नांवर पडेल. त्यामुळे आता राज्याला पार्ट टाईम नव्हे तर फुलटाईम महिला आयोग अध्यक्षा हव्या अशी जनतेची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मागणी केली आहे की महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी जेणेकरून आयोगाचा कारभार सुरळीत चालेल.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही चाकणकरांवर टीका करत म्हंटले, “ महिला आयोगाच्या अध्यक्षा संवेदनशील असाव्या. पण चाकणकर या तशा दिसत नाहीत. फक्त पक्षाच्या विरोधात काही असेल तर पदर खोचून उभ्या राहतात. चाकणकर यांची वागणूक दिवसेंदिवस उद्धट होत चालली आहे. टेलिव्हिजन चर्चांमध्ये त्या संवेदनशीलतेऐवजी चिल्लर भाषेचा वापर करतात. अशा महिला आयोगाच्या अध्यक्षांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही.”
बेटिया फाउंडेशनच्या प्रमुख संगीता तिवारी यांनीही चाकणकरांवर टीका करत म्हंटले, ''६ नोव्हेंबर २०२४ रोजी हगवणे कुटुंबातील मोठ्या सुनेने अत्याचाराची तक्रार केली होती. परंतु, त्यानंतरही योग्य कारवाई झाली नाही. ७ नोव्हेंबरला चाकणकर यांनी पोलिसांना प्रकरण मिटवण्यासाठी बैठकीचे निर्देश दिले. त्यांनी एफआयआर नोंदवण्याऐवजी प्रकरण गुपचूप मिटवण्याचा प्रयत्न का केला? हे सगळं राजेंद्र हगवणे यांना वाचवण्यासाठी केलं गेलं.” असा आरोप तिवारी यांनी केला.
करुणा शर्मा यांनी चाकणकर यांच्यावर आरोप करत म्हंटले, की रूपाली चाकणकर यांना त्यांच्या सौंदर्यामुळे महिला आयोगाचे अध्यक्षपद मिळाले. पण महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा उद्देश राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी नाही. उलट, त्यांचे काम महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारींना न्याय देणे आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात वैष्णवी, पूजा चव्हाण, करुणा आढळतात. पण तक्रार करूनही त्यांना न्याय मिळत नाही. महिला आयोगाला ९०१ महिलांकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी किती जणांना न्याय मिळाला आहे? रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
रूपाली चाकणकर यांचे प्रतिउत्तर -
विरोधकांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना चाकणकर म्हणाल्या, “विरोधक नेहमीच टीका करतात, त्याला मी फारसे महत्त्व देत नाही. आयोगाने नेहमी तक्रारी गांभीर्याने घेतल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, या प्रकरणात मी सुरुवातीपासूनच सहभागी आहे. सहा दिवसांनी एखाद्या व्यक्तीने ट्विट केल्यावरच सगळ्यांना जाग आली.
तसेच चाकणकर यांनी आरोप फेटाळताना विरोधकांवरही जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, या लोकांची मानसिकता म्हणजे हुंड्यासाठी सुनांना छळणाऱ्यांसारखीच आहे. त्यांना मला ट्रोल करण्यासाठी पैसे मिळतात. तसेच, आयोगाकडील आकडेवारी सादर करत त्यांनी सांगितले की, आतापर्यंत ३५,८०० तक्रारी आयोगाला प्राप्त झाल्या असून त्यापैकी ३५,२०० तक्रारींचे निराकरण झाले आहे. मला हा डेटा द्यायचा नव्हता, पण गेल्या काही दिवसांत चिल्लर आवाज खूपच वाढला आहे,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
राष्ट्रवादीचा दूसरा ग्रुप काय म्हणतो त्याच्यासाठी आमच्याकडे महत्त्व नाही. आम्ही शून्यापेक्षा जास्त किंमत देत नाही. लोकांनी त्यांना नाकारले आहे. यामध्ये आयोगाने काय करायचं? पक्षाने काय करायचं? हा पक्षाच्या वरिष्ठांचा निर्णय आहे. ज्यांना कोणाला हे पद मिळाले नाही, त्याच्या पर्यंत पोहचता आले नाही. त्यांची असूया मी समजू शकते. महाराष्ट्र पोलिस उत्तम रित्या काम करत असताना इतर राज्यांमध्ये काम करताना उशीर झाला की महाराष्ट्र पोलिसांना आमंत्रित केलं जाते. याचा आम्हाला अभिमान आहे असेही त्यांनी म्हंटले आहे.