महाराष्ट्र

आता वेध लागले साखरचौथ गणेशोत्सवाचे... पनवेल, उरण, पेण, अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात होतो साजरा

नुकतीच अनंत चतुर्दशी झाली आणि १० दिवस भक्तांच्या घरी विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. आता रायगड जिल्ह्यात वेध लागले आहेत ते साखरचौथ गणेशोत्सवाचे.

अरविंद गुरव

पेण : नुकतीच अनंत चतुर्दशी झाली आणि १० दिवस भक्तांच्या घरी विराजमान झालेल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. आता रायगड जिल्ह्यात वेध लागले आहेत ते साखरचौथ गणेशोत्सवाचे.

भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीला म्हणजेच १० सप्टेंबर रोजी साखरचौथ गणेशाचे आगमन होत आहे. जिल्ह्यात साखरचौथीच्या सुमारे ८८० गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यात एकट्या पेण तालुक्यात सुमारे ३३० गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती गणेशमूर्तीसाठी भक्तांची तयारी सुरू आहे. यात पेण शहरात सार्वजनिक ६७ तर घरगुती १२० गणेश मूर्तिंची प्राणप्रतिस्थापना होते.

साखरचौथीच्या गणपतीच्या प्रथेला कोणताही लिखित व शास्त्रीय आधार मिळत नाही. कोणतीही पौराणिक कथा यामागे आढळून येत नाही; परंतु वर्षानुवर्षे परंपरा सुरू आहे. गणेशाच्या प्रतिस्थापनेसाठी सहसा पितृपक्षाचा विचार केला जात नाही. पूर्वी हे गणपती दीड दिवसाचे होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून काही ठिकाणी या गणपतीची स्थापना अडीच व पाच दिवसही करण्यात येते. ज्यांना गणेश चतुर्थीच्या दिवशी काही कारणास्तव गणेशमूर्ती आणणे शक्य नसते, त्यांच्यासाठी साखर चौथीच्या गणपतीचा पर्याय स्वीकारला जातो.

साखरचौथीच्या गणेशाची प्रतिस्थापना जिल्ह्यातील पनवेल, उरण, पेण व अलिबाग या तालुक्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते; आता हळूहळू संपूर्ण जिल्ह्यात हे वातावरण निर्माण होत आहे. पेणमध्ये मागील २५ ते ३० वर्षांपासून हा गणेशोत्सव साजरा केला जात असून शहरातील गुरव आळी आणि दामगुडे आळी या दोन ठिकाणापासून हा उत्सव सुरू झाला. हळूहळू वर्षानुवर्षे या उत्सवाची क्रेज वाढत गेली आणि आजमितीला या उत्सवाला शेकडो गणपती मूर्ती पेणमध्ये विविध ठिकाणी विराजमान केलेल्या पहावयास मिळतात.

विभक्त कुटुंब पद्धती वाढत चालल्याने प्रत्येकाला हौस म्हणून घरी गणपती आणावासा वाटतो. मूळ कुटुंबात गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती असल्यामुळे हा उत्सव झाल्यानंतर साखरचौथीच्या दिवशी अनेक जण आपल्या घरात गणपतीची प्रतिस्थापना करतात. गणेश चतुर्थीच्या काळात जर घरात काही दुर्घटना घडली वा सुतक आले तर ते संपल्यावर त्यावर्षी साखरचौथीच्या दिवशी पर्याय म्हणून गणपतीची स्थापना करतात.

साखरचौथ गणपती

साखरचौथ गणपती उत्सवाचा उद्देश काय?

हा उत्सव साजरा करण्याचा मूळ हेतू म्हणजे पेण तालुक्यातील जवळपास ७० टक्के भागात गणेशमूर्ती बनविण्याचे कारखाने आहेत आणि पेण तालुक्यातील गणेशमूर्ती जगप्रसिद्ध असल्याने त्यांना मागणी सुद्धा तेवढीच असते. अगदी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी दुपारपर्यंत या कारखानदारांना आपल्या घरातील बाप्पाची तयारी करायला वेळ नसतो आणि आपल्या घरामध्ये बाप्पा विराजमान होऊनही त्याची आदरातिथ्य पूजा अर्चा करायला मिळत नाही याची खंत त्यांच्या मनात असते. मग हा विचार करून गणेशोत्सव झाल्यावर थोडासा विसावा घेऊन पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पेणमध्ये हा साखरचौथ गणेशोत्सव साजरा केला जातो.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी