मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करताना प्रकृती खालावल्याने मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णलयात उपचार घेत आहेत. जरांगे यांना भेटण्यासाठी संभाजीराजे छत्रपती हे रुग्णलयात दाखल झाले होते. या भेटीनतंर संभाजी राजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. पुढच्या लढ्यासाठी आणखी बळ यावं यासाठी मी मनज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यांची रिकव्हरी चांगली असून लिव्हर आणि किडनीवरील सूज कमी झाली आहे. तरी देखील त्यांचा लवकर डीस्चार्ज करण्याऐवजी जास्तीत जास्त दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
संभाजी राजे पुढे बोलताना म्हणाले की, मनज जरांगे यांना भेटण्यासाठी गर्दी करु नये. हॉस्पिटलमध्ये शिस्त पाळण्यात यावी. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा ही माझी देखील भूमिका असते. २००७ पासून मी समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढा देत आहे. मनोज जरांगेंच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटणार आहेत याचा आनंद आहे. जे समाजासाठी लढा देतात अशांना बळ देण्यासाठी उभं राहणं हे आपलं काम आहे. मनोज जरांगेंचा सरकारव दबाव आहेच आणि आणखी दबाव वाढवण्यासाठी मी इथं आलो आहे, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, शनिवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारच्या आणखी एका शिष्टमंडळाने भेट घेतली. मंत्री संदीपान भूमरे, अतुल सावे, मंगेश चिवटे यांनी सुधारित जीआर मनोज जरांगेंना सुपूर्द केला आहे. या जीआरनुसार सरकार केवळ मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण राज्यात कुणबी नोंदी शोधणार आहे. माजी न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीच्या कार्यकक्षा सरकारने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.