संजय राऊत 
महाराष्ट्र

छगन भुजबळ शिवसेना ठाकरे गटात परतणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती.

Suraj Sakunde

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती. दरम्यान भुजबळ शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा कालपासून राजकीय वर्तुळात सुरु होती. भुजबळांनी शिवसेना ठाकरे गटाच्या दोन बड्या नेत्यांची भेट घेतल्याचंही बोललं जात होतं. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. छगन भुजबळ शिवसेनेत येणार ही फक्त अफवा असून शिवसेनेचा कोणताही नेता त्यांना भेटलेला नाही, असं संजय राऊत म्हणाले.

आम्ही वातावरण बिघडवू इच्छित नाही...

संजय राऊत म्हणाले की, "छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. पुढे ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि सध्या ते अजित पवार गटासोबत आहेत. आता त्यांचं शिवसेनेचं तसं नातं नाहीये. छगन भुजबळ आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरु असल्याच्या अफवा आहेत. अशी कोणतीही चर्चा नाही. शिवसेनेचं सर्व ठिकठाक चाललं आहे. आता आम्ही वातावरण बिघडवू इच्छित नाही."

भुजबळांच्या भूमिका शिवसेनेच्या भूमिकेशी मेळ खात नाहीत...

राऊत पुढे म्हणाले की, छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेत होते, तेव्हा खूप मोठे नेते होते. आमचेही नेते होते. ते कोणत्याही एका पक्षात टिकून राहिले असते, तर नक्की मुख्यमंत्री बनले असते. छगन भुजबळ यांचा मोठा प्रवास आहे. त्यांच्या प्रवासात शिवसेना खूप मागे राहिली आहे आणि राजकीय प्रवासात शिवसेना खूप पुढे गेली आहे. छगन भुजबळ यांच्याशी शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा राजकीय संवाद नाही आणि होण्याची शक्यताही नाही. कारण त्यांनी स्वतःचा एक मार्ग निवडला आहे. त्यांच्या काही भूमिका आहेत. त्या भूमिकांशी शिवसेनेच्या भूमिका मेळ खात नाहीत. अशा प्रकारच्या बातम्या पेरून राजकीयदृष्या गोंधळ उडवून देण्याचा प्रयत्न आहे. छगन भुजबळांना आमच्यापैकी कुणीही भेटलं नाही."

महाराष्ट्राच्या शत्रूंशी हातमिळवणी करणाऱ्यांशी आमचा संबंध नाही...

जे येतील त्यांच्या सोबत, जे येणार नाहीत, त्यांच्याशिवाय पुढे जाऊ, या शरद पवारांच्या वक्तव्याविषयी राऊत यांना विचारलं असता राऊत म्हणाले की, "शरद पवार साहेबांची भुमिका असू शकते. शिवसेनेची भुमिका स्पष्ट आहे. अडीच वर्षांपासून ज्यांनी शिवसेनेवर दावा मांडला. शिवसेना फोडली. महाराष्ट्राच्या शत्रूंशी हातमिळवणी केली. त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही आणि राहणार नाही. त्यांच्याशिवाय शिवसेना पुढे गेली आहे. हजारो लाखो निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं ९ खासदार निवडून आणले. काही कमी फरकाने पडले. आज शिवसेनेचा ५८ वा वर्धापनदिन आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, ती अशा बेईमान लोकांना छातीवर घेण्यासाठी नाही. ज्यांनी मराठी राज्याशी, मराठी माणसाशी बेईमानी केली, त्यांच्याशी संबंध ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष कधी पुढे नेला नाही. जे सोडून गेले त्यांच्याशिवाय निष्ठावंत शिवसैनिकांच्या मदतीनं ही शिवसेना इथपर्यंत आणली आणि उद्धव ठाकरे यांनी त्याही पुढे नेली. त्यामुळं हा आला, तो येणार का..या प्रश्नांवर आम्ही चर्चा करत नाही."

त्यांना म्हणावं २८८ पैकी ४०० जागा जिंका...

चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुती विधानसभेच्या पावणे दोनशे जागा जिंकेल, या वक्तव्यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली. राऊत म्हणाले की, "त्यांचा पक्ष आहे. पहिले डबल इंजिनवाला पक्ष होता, त्यानंतर शिंदे आल्यावर डबल इंजिन झालं. त्यानंतर अजित दादा आल्यावर ट्रिपल इंजिन झाले. राज ठाकरे आल्यावर चार इंजिन झाली. आता पाच-सहा इंजिनवाला पक्ष आहे. ही सगळी इंजिन बंद करून महाविकास आघाडी पुढे चालली आहे. त्यांनी अजून कितीही इंजिन लावली, तरी कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक जिंकणार. त्यांनी पावणे दोनशे जागा नको त्यांनी कमीत कमी साडे तीनशे जागा जिंकायला हव्यात. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींचा चारशे पारचा नारा त्यांना पूर्ण करता आला नाही. महाराष्ट्रात २८८ जागा असल्या तरी त्यांनी ४०० पार जागा जिंकाव्या."

वारकऱ्यांनी तुमचं अनुदान नाकारलं....

या सरकारला माणसं विकत घेण्याचं व्यसन आहे. मत विकत घ्यायचे, अधिकारी, सत्ता, आमदार, खासदार विकत घ्यायचे. त्यांच्याकडे चोरीचे पैसे आहेत. पण या चोरीच्या पैशातून काल वारकरी संप्रदायाला विकत घेण्याचा प्रयत्न झाला. वारकऱ्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले होते का? वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये दिले म्हणून तुमच्यावर टीका झाली. म्हणून तुम्ही वारकऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करताय. पण वारकऱ्यांनी तुमचं अनुदान नाकारलं, त्याबद्दल त्यांच्या स्वाभिमानाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन