हिंगोली : हिंगोलीतील कळमनुरी येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रातच मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बांगर यांच्या या कृतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना चांगलेच सुनावले आहे.
हिंगोली शहरातील मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे सकाळी संतोष बांगर मतदानासाठी पोहोचले. तेव्हा त्यांनी महिला मतदाराला ईव्हीएमवर बटन दाबण्याबाबत सांगितले. तसेच मतदान केंद्रात ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो’ आणि ‘एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है,’ अशी घोषणाबाजी केली. मोबाइल फोनचादेखील वापर त्यांनी केला. मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, फोन वापरणे किंवा मतदाराला मतदानाविषयी निर्देश देणे, ही कृती गोपनीयतेचा भंग आणि आचारसंहितेचा गंभीर उल्लंघन मानले जाते. त्यामुळे संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत होती.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व व्हिडिओंची तपासणी करून अहवाल मागवला आहे. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचे आढळल्यास संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहितीही निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बांगर यांचे कान उपटले. “किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसे वागतोय, आपण कोणता संदेश देतोय, याचा विचार केला पाहिजे,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बांगर यांना सुनावले.