नागपूर : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठ्या ‘आका’ला वाचविण्यासाठी लहान ‘आका’चा एन्काऊंटर होऊ शकतो, असा दावा गुरुवारी माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याने खळबळ माजली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याचे बीड पोलीस ठाण्यात लाड पुरवले जात असल्याचा आरोप केल्यानंतर वडेट्टीवार यांनी एन्काऊंटरचा दावा केला आहे.
पोलीस ठाण्यात कराडचे लाड पुरविण्यात येत असल्याच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे. पोलीस ठाण्यात पलंग नेण्यात आले, ते पोलिसांसाठी नेले असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी पोलीस ठाण्यात पोलीस कधी पलंगावर झोपल्याची माहिती नाही, हे कोणाचे लाड आहेत, वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, तो पोलीस कोठडीत असताना पलंगावर झोपता यावे यासाठी नेले आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
एन्काऊंटर होऊ शकतो
वडेट्टीवार यांनी एक वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने, या गुन्ह्यातील सूत्रधारांना वाचवण्यासाठी आरोपीचे एन्काऊंटर केले जाऊ शकते, असा दावाही केला आहे. आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती अशी आहे की, मोठ्या 'आका'ला वाचवण्यासाठी या लहान 'आका'चा एन्काऊंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका. त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. आपल्याला काल ही विश्वसनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. यावरून काहीही होऊ शकते, अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे, असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार यांची पोस्ट
विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत महायुती सरकारवर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, महायुती सरकारच्या लाडके आरोपी योजनेत वाल्मिक कराड येत असल्याने बीड पोलीस ठाण्यात नवीन पाच पलंग आले का? वाल्मिक कराड पोलीस कोठडीमध्ये असताना पाच पलंगांची आवश्यकता भासावी, इतके योगायोग चित्रपटातही नसतात. आरोपीचे लाड पुरविण्याची ही सुरुवात आहे, हळूहळू टीव्ही, वातानुकूलित यंत्रणा, पंचतारांकित हॉटेलमधील जेवण सगळेच मिळेल, असे ते म्हणाले.
वाल्मिक कराडवर या सरकारला निष्पक्ष कारवाई करायची आहे का, करायची असेल तर बीड जिल्ह्याबाहेर चौकशी आणि तपास केला पाहिजे. ज्याने पोलिसांना आतापर्यंत आपल्या धाकात ठेवले ते त्याची चौकशी करणार की सेवा, सरकारने कराडवर कारवाई करण्याचे नाटक एकतर बंद करावे आणि कारवाई करायची असेल तर ती गांभीर्यपूर्वक करावी. कराडवर अजूनही ‘मकोका’अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असेही वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.