बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सोमवारी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी मारण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला होता. मात्र, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी केलेल्या विनंतीनंतर धनंजय देशमुख टाकीवरून खाली उतरले.
संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरण एकमेकांशी संबंधित असल्याने वाल्मिक कराडवर ‘मकोका’ लावून सरपंच हत्या प्रकरणात त्याला सहआरोपी करा, फरार कृष्णा आंधळेला अटक करावी, शासकीय वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करावी, एसआयटीतील पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्त्ती करा, तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना द्या, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्फ करून सहआरोपी करा, अशा मागण्या देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केल्या आहेत.
पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आरोपी आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड याला तपास यंत्रणांकडून वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांसह ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गावातील पाण्याच्या उंच टाकीवर चढून आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी मारण्याचा इशाराही देशमुख यांनी दिला होता.
धनंजय देशमुख टाकीवर चढून आंदोलन करणार असल्याचे समजताच मनोज जरांगे हे जालन्याहून मस्साजोगकडे रवाना झाले होते. मात्र, तिथे पोहोचण्याआधीच देशमुख हे पोलिसांना चकवा देऊन आपल्या दोन नातेवाईकांसह पाण्याच्या टाकीवर गेले. तसेच त्यांनी टाकीवर जाताच शिडीही काढून फेकल्याने पोलिसांना वर जाता येत नव्हते. घटनास्थळी पोहोचलेल्या मनोज जरांगे यांनी धनंजय देशमुखांना खाली उतरण्याची विनंती केली. मात्र देशमुख हे आपल्या आंदोलनावर ठाम होते.
देशमुख यांना विनवणी करताना मनोज जरांगेंच्या डोळ्यांत अश्रूही तरळले. त्यानंतर काही वेळाने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत हेही तेथे पोहोचले. तुमच्या मागण्यांवर पोलीस प्रशासन सकारात्मक आहे, मी स्वत: याबाबत सीआयडी आणि एसआयटीच्या प्रमुखांशी बोलतो, असा शब्द काँवत यांनी दिला. मनोज जरांगे आणि नवनीत काँवत यांच्याकडून वारंवार करण्यात आलेल्या विनंतीनंतर अखेर दोन तासांनी धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले. दरम्यान, मनोज जरांगे यांच्याशी बोलताना धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक सहकार्य करत आहेत. मात्र, एसआयटी, सीआयडी यांच्याकडून कसल्याही प्रकारचे सहकार्य होत नाही, तपास कुठपर्यंत आला याची माहिती दिली जात नाही, असा आरोप केला. धनंजय देशमुख पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर तब्बल दोन तासांच्या आंदोलनानंतर जलकुंभावरून खाली उतरले.
वैभवी देशमुख आक्रमक
आंदोलनात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी सहभागी असून तिने प्रथमच आक्रमक भूमिका घेतली आणि पोलीस, राज्य सरकारबद्दल संताप व्यक्त केला. आजवर आम्ही खूप शांततेत आंदोलन केले, पण काहीच हाती लागत नाही. काय तपास सुरू आहे, याची माहिती आम्हाला देण्यात येत नाही, काकाला काय झाले तर कोण जबाबदार, घरातील एक माणूस गेला तरी प्रशासन काही करत नाही. वडील गेले, आता आम्ही सर्व गेलो तर यांचे डोळे उघडणार आहेत का, असा उद्विग्न सवाल तिने केला.
आम्हाला न्याय पाहिजे, वाल्मिक कराडवर ‘मकोका’ लावा, फरार आरोपीस तत्काळ अटक करा, अशा जोरदार घोषणाबाजीने मस्साजोग येथील आंदोलन स्थळ परिसर दणाणून गेला आहे. मस्साजोग येथे वातावरण तापले आहे. ग्रामस्थांनी जलकुंभाखाली ठिय्या दिला. तसेच काही ग्रामस्थ पायऱ्यावर चढले. धनंजय देशमुख यांनी शिडी काढून घेतल्याने पोलीस वर जाण्यात असमर्थ ठरले. त्यामुळे अग्निशामन दलाची गाडी येथे दाखल झाली होती.
बांगड्या फेकल्या
आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्यावर बांगड्यासुद्धा फेकल्या आणि या प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप येथील महिलांनी केला.
खंडणीतील आरोपी सरकार चालवतो का? - जरांगे
एकच सांगणे आहे की खंडणीमुळेच हत्या झाली आहे. सामान्य शेतकऱ्यांनाही हा विषय कळतो, तुम्ही तर अनुभवी मुख्यमंत्री आहात. खंडणीमुळेच हत्या झाली आहे. खंडणीतल्या आरोपीला मोकळे सोडणार असाल तर कुटुंबाचा धीर सुटणार नाहीतर काय होणार. त्या आरोपीला ३०२ मध्ये घ्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या प्रकरणात चुकीचे पाऊल पडले आहे. त्यामुळे आम्हाला आता यात उतरावे लागत आहे. फेकलेला मोबाइल पोलिसांना अजून कसा सापडत नाही. त्या मोबाइलमध्ये बरेच पुरावे आहेत, असे कळले आहे. अनेक लोक त्यात गुंतणार आहेत, असे दिसत आहे. खंडणीतला जो आरोपी वाचवू पाहात आहात तो तुमचे सरकार चालवतो आहे का, खंडणीतला आरोपी मोदींपेक्षा मोठा आहे का, कोणते राजकारण, कोणते सरकार तुम्ही चालवत आहात, असे प्रश्न मनोज जरांगेंनी उपस्थित केले. कुणालाही सोडणार नाही हा शब्द फडणवीस यांनी दिला आहे. माझे म्हणणे आहे की फडणवीस यांनी जबाबदारी घ्यावी आणि कुणालाही सोडू नये. तपास यंत्रणांचे हात बांधले गेले आहेत का, अशी शंका येण्यास जागा आहे. आज देशमुख कुटुंबाला काय काय झाले ते सांगितले पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.
...तर मुंडेंच्या टोळीचे जगणे मुश्कील करू
आमचा संयम सुटत चालला आहे. कारण धनंजय देशमुख आत्महत्या करायची असे म्हणत आहेत. त्यामुळे आमचे शब्दही त्याच पद्धतीने बाहेर पडणार. देशमुख कुटुंबाला जर धक्का लागला तर आम्हालाही मराठे म्हणतात हे ध्यानात ठेवा. चुकीच्या दिशेने तपास केला आणि देशमुख कुटुंबातील एकालाही काही झाले आणि जर तो आरोपी सुटला तर धनंजय मुंडेंच्या टोळीचे जगणे मुश्कील करेन, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला आहे.
धमकी आधीपासूनच - अश्विनी देशमुख
संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, संतोष देशमुख यांना महिनाभर आधीपासून धमकी येत होती. त्या म्हणाल्या, पवनचक्की प्रकरणावरून त्यांचे भांडण झाले होते. तेव्हापासून ते तणावाखाली होते. त्यांनी दूरध्वनीवरून एवढेच सांगितले की पवनचक्कीवरून किरकिर झाली आहे. ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, असेही त्या म्हणाल्या. भांडण झाल्यानंतर शनिवारी ते लातूरला आले होते. त्यांनी मला सांगितले की मला खूप भीती वाटतेय. ते गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत, मला मारहाण करतील. त्यामुळे मी त्यांना म्हटले की भीती वाटतेय तर गावी जाऊ नका. थोडे दिवस इथे थांबा. त्यामुळे ते शनिवारी गावी परतले नाहीत. रविवारीही लातुरला थांबले. पण त्यांना सतत कोणाचे तरी फोन येत होते. सतत फोन यायला लागल्याने ते गावी जातो, असे सांगून सोमवारी निघून गेले, असे अश्विनी देशमुख म्हणाल्या.
ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा
आंदोलन स्थगित केल्यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांच्यावतीनेही भूमिका मांडण्यात आली. त्यातील एका ग्रामस्थाने सांगितले की, मनोज जरांगे यांच्या विनंतीनंतर आम्ही हे आंदोलन स्थगित केले आहे. मंगळवार सकाळी १० वाजेपर्यंत गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर उद्या ब्रह्मदेव आला तरी आम्ही थांबणार नाही. आज मी एकटाच आत्मदहन करणार होतो, पण संपूर्ण गाव अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करेल, असा इशारा त्यांनी दिला.
कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
धनंजय देशमुख यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, एसआयटीचे प्रमुख आणि सीआयडीच्या प्रमुखांना दूरध्वनी केला. यावेळी फडणवीसांनी एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा, कुणालाच दयामाया दाखवू नका, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. यासह मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेतला.
चाटेच्या कोठडीत वाढ
देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णु चाटे याची दोन दिवसांची कोठडी संपली होती. त्यानंतर चाटेला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले या सुनावणीमध्ये चाटेच्या न्यायलयीन कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. विष्णू चाटे याला १८ जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विष्णू चाटे हा वाल्मिक कराड याचा मावसभाऊ लागत असल्याची माहिती आहे.