महाराष्ट्र

वाल्मिक कराडची शरणागती; सीआयडीमार्फत प्राथमिक चौकशी व अटक

संतोष देशमुख हत्या प्रकरण : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेला संशयित वाल्मिक कराड हा मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला.

Swapnil S

पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी फरार असलेला संशयित वाल्मिक कराड हा मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांना शरण आला. सीआयडीने वाल्मिक कराड याची प्राथमिक चौकशी करून त्याला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला बीडला रवाना करण्यात आल्याची माहिती सीआयडीचे (CID) पोलीस उपमहानिरीक्षक सारंग आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यावर आता कोणते गुन्हे दाखल करणार याकडे जाणकारांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, आपल्यावरील आरोप वाल्मिक कराडने फेटाळून लावले आहेत.

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली होती. ही हत्या वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून झाली, असा आरोप केला जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बीड पोलीस आणि सीआयडीची पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती. मात्र, वाल्मिक कराड याने तब्बल २३ दिवस पोलिसांना गुंगारा दिला. मंगळवारी तो पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजर झाला.

सुरुवातीला बीड पोलीस आणि त्यानंतर सीआयडीच्या ९ पथकांमधील १५० कर्मचारी रात्रंदिवस काम करत असूनही त्यांना वाल्मिक कराड याचा शोध लागला नव्हता. अखेर वाल्मिक कराड याने शरण येण्यासाठीची वेळ आणि स्थळ स्वत:च ठरवले आणि त्याने आत्मसमर्पण केले. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणताही गुन्हा नाही. त्यांच्याविरोधात केवळ पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे आता सीआयडीचे अधिकारी वाल्मिक कराड याची चौकशी नेमकी कोणत्याप्रकारे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवला जाणार का? याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

वाल्मिक कराड यांच्याविरोधात खंडणीचा जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्याचा तपास बीड पोलिसांकडेच आहे. मात्र, तरीही वाल्मिक कराड याने शरण येण्यासाठी सीआयडीचा पर्याय का स्वीकारला, याची चर्चा आता रंगली आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जाते. गेली अनेक वर्षे वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची आणि नियोजनाची सूत्रे सांभाळत आहे. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यापासून धनंजय मुंडे यांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपदही धोक्यात असल्याची चर्चा आहे.

काय म्हणाला वाल्मिक कराड?

मी वाल्मिक कराड, केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझे नाव जोडले जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे.

‘मी खंडणी प्रकरणातील गुन्ह्यात आरोपी असून मी अटकपूर्व जामिनासाठी देखील अर्ज करू शकतो. माझ्यावर राजकीय सुडातून हे आरोप केले जात असून संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे’, असे वाल्मिक कराडचे म्हणणे आहे. कराडच्या शरणागतीनंतर आता काय नवे खुलासे होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाल्मिक कराड ३ दिवस पुण्यातच होता?

वाल्मिक कराडच्या एका कार्यकर्त्याने आम्ही आता अक्कलकोटवरून आलेलो आहोत असे सांगितले, तर एका नगरसेवकाने वाल्मिक कराड गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातच असल्याचा खुलासा केला आहे. वाल्मिक कराडवर खोटे आरोप करण्यात आले. तो आज स्वतःहून हजर झाला आहे. खोट्या आरोपांमुळे तो घाबरला असेल म्हणून पोलिसांसमोर आला नसेल, असेही या नगरसेवकाने म्हटले आहे. यामुळे वाल्मिक कराडचा शोध घेणाऱ्या पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, केज पोलीस स्टेशनला ११ डिसेंबरला वाल्मिक कराडवर दाखल झालेला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंडाराज सहन करणार नाही - फडणवीस

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणाचीही गय केली जाणार नाही आणि कोणत्याही स्थितीत गुंडाराज सहन केले जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे स्पष्ट केले. देशमुख यांच्या भावाशी आपण दूरध्वनीवरून संपर्क साधून न्याय देण्याची ग्वाही त्यांना दिली. दोषींना फासावर लटकविल्याशिवाय पोलीस आपल्या कर्तव्यात कसूर करणार नाहीत. पोलीस सध्या फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही. आम्ही फरारींच्या मुसक्या आवळू, असेही ते म्हणाले.

वडिलांना लवकर न्याय द्या - वैभवी देशमुख

माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. इतके दिवस झाले पोलीस यंत्रणा काम करते आहे. पण त्यांना इतका वेळ का लागत आहे, गुन्हेगार स्वतः शरण येत आहे तर मग इतके दिवस पोलीस यंत्रणा काय करत आहे. त्यांना पकडण्यासाठी इतका वेळ लागत असेल, तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची. आम्हाला न्याय कधी मिळणार, माझी एकच मागणी आहे. ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या केली. जे तीन आरोपी फरार आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करावी. माझ्या वडिलांना आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या एवढीच अपेक्षा आहे, असे मृत संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी म्हटले आहे.

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : निरोप घेतो देवा, आता आज्ञा असावी...मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ; मिरवणुकीला जल्लोषात प्रारंभ

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

मला विचारून 'जीआर' काढल्याचा गैरसमज पसरवू नका! मंत्री भुजबळांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा