मुरूड-जंजिरा : रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी काशीद ग्रामपंचायत सरपंच संतोष जयराम राणे यांचे पद अनहर्त ठरवले होते. याआधी संतोष राणे यांनी महाराष्ट्र शासनाची जागा नोटरी करून सुमारे १२ लाख रुपयांना विकल्याचा आरोप केला होता. या निर्णयानंतर सरपंच संतोष राणे सरपंच पदावरून दूर ठेवले गेले होते.
संतोष राणे यांनी हा निर्णय आव्हान म्हणून कोकण आयुक्त यांच्याकडे दाद मागितली. सर्व कागदपत्रांची तपासणी व न्यायालयाचे निकाल पाहून, कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकारी रायगड यांचा निर्णय रद्द केला. त्यामुळे काशीद ग्रामपंचायत सरपंच संतोष राणे यांचे पद अबाधित राहिले आहे.
प्रकरणातील तपशिलानुसार, काशीद येथील सर्वे नंबर २८/२ या जागेवर अतिक्रमण झाले आहे की नाही, यासाठी मोजणी आवश्यक होती. परंतु, सदर मोजणी किंवा कोणत्याही पुराव्यांचा अभाव असल्याने असे सिद्ध झाले नाही की मालमत्ता क्रमांक ५१७ हा अतिक्रमित प्लॉट आहे. तसेच, भूमी अभिलेखात देखील अपिलार्थींचे नाव कुठेही नोंदलेले नाही.
कोकण आयुक्तांनी सर्व बाबींचे परीक्षण केल्यावर जिल्हाधिकारी रायगड यांचा निर्णय रद्द केला व प्रकरण पुन्हा परीक्षणासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवले. या निर्णयामुळे सरपंच संतोष राणे यांना मोठा दिलासा मिळाला असून ते पुन्हा सरपंच पदावर कार्यरत राहणार आहेत.