Satara : फलटणमध्ये दूध संकलनात २७ हजार लिटरची घट; दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश, FDA च्या कारवाईनंतर संकलकांचा हात आखडता  
महाराष्ट्र

Satara : फलटणमध्ये दूध संकलनात २७ हजार लिटरची घट; दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश, FDA च्या कारवाईनंतर संकलकांचा हात आखडता

फलटण तालुक्यातील होळ येथे कृत्रिम भेसळयुक्त दूध तयार करून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सोमनाथ डेअरीला पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पर्दाफाश केला आहे.

रामभाऊ जगताप

रामभाऊ जगताप / कराड

फलटण तालुक्यातील होळ येथे कृत्रिम भेसळयुक्त दूध तयार करून बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सोमनाथ डेअरीला पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पर्दाफाश केला आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील दैनंदिन दूध संकलनात तब्बल २७ हजार लिटरची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी चौघांसह संबंधित डेअरीचे संचालक व मालकाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भेसळीसाठी वापरले जाणारे रासायनिक साहित्य व यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. या तपासातून राज्यव्यापी दूध भेसळ साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १२ जुलै रोजी होळ येथे छापा टाकण्यात आला. यावेळी मंगल दिलीप भोसले यांच्या ताब्यातील गोठ्यालगतच्या खोलीत भेसळीसाठी वापरले जाणारे रासायनिक पदार्थ, मिक्सर आणि अन्य साहित्य आढळून आले. तपासात या पावडरमध्ये पाणी मिसळून गाईच्या दुधात त्याचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार केले जात असल्याचे निष्पन्न झाले. हे दूध बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील सोमनाथ डेअरीला पुरवले जात असल्याचेही उघड झाले. तसेच भेसळीसाठी वापरली जाणारी पावडर नीरा (जि. पुणे) येथील एका पुरवठादाराकडून आणली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी मंगल दिलीप भोसले, दिलीप भीमराव भोसले, कुणाल दिलीप भोसले, एक पुरवठादार तसेच संबंधित डेअरीचे संचालक व मालक यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि संपूर्ण पुरवठा साखळीची सखोल चौकशी सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे करीत आहेत.

९५ टक्के दूध व्यवसाय खासगी कंपन्यांच्या ताब्यात

राज्यभरात सुरू असलेल्या एफडीएच्या धडक कारवाईचा परिणाम सातारा जिल्ह्यातील दूध संकलनावरही दिसून आला आहे. गेल्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील दैनंदिन दूध संकलनात तब्बल २७ हजार लिटरची घट झाल्याची माहिती समोर आली आहे. भेसळीविरोधातील कारवाईच्या भीतीने अनेक दूध संकलकांनी हात आखडता घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्ह्यात दररोज सुमारे २०.६३ लाख लिटर दूध संकलित होत असून त्यापैकी सुमारे ९५ टक्के दूध व्यवसाय खासगी कंपन्यांच्या ताब्यात आहे.

कठोर कारवाईचा इशारा

सहकारी संस्थांचा वाटा अत्यल्प झाला असून शासकीय क्षेत्रातील दूध संकलन जवळपास शून्यावर आले आहे. त्यामुळे खासगी दूध संकलन केंद्रे, शीतकरण प्रकल्प आणि डेअरींची नियमित तपासणी करून भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मोहिमेमुळे दूध भेसळ प्रकरणांवर मोठा आळा बसत असल्याचे चित्र दिसत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवा; दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश

वाहनांसाठीचे नियम कडक; एप्रिल २०२७ पासून कॅफे-३ इंधन कार्यक्षमता लागू करण्याचा सरकारचा प्रस्ताव

Pune : सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील

ई२० पेट्रोलमुळे झाले नुकसान; मारुतीला भरपाई देण्याचे आदेश, पहिला आदेश ठरला ऐतिहासिक

२० वर्षांचा मेस्सी आणि ‘ते’ बाळ