कराड : जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मलवडी गावच्या त्रिंबक बोराटे यांच्या मालकीच्या 'राधा'ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. केवळ ८३.८ सेमी म्हणजेच २ फूट ८ इंच उंचीच्या या ठेंगण्या 'राधा'ला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
मलवडीतील शेतकरी व पशुपालक त्रिंबक बोराटे यांच्या घरच्याच म्हैशीच्या पोटी १९ जून २०२२ रोजी 'राधा'चा जन्म झाला. 'राधा' दोन-अडीच वर्षांची झाल्यावर तिच्या उंचीतील बदल त्रिंबक बोराटे यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्रिंबक बोराटे यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत याने 'राधा'ला कृषी प्रदर्शनात सहभागी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. २१ डिसेंबर २०२४ ला सोलापूर येथील सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात पहिल्यांदा 'राधा'ने सहभाग घेतला. अन् 'राधा'चा सर्वत्र बोलबाला सुरू झाला. त्यानंतर पुसेगावचे सेवागिरी कृषी प्रदर्शन व कर्नाटकातील निपाणी येथील कृषी प्रदर्शनासह एकूण १३ कृषी प्रदर्शनात खास आकर्षण म्हणून 'राधा'ला निमंत्रित करण्यात आले. आता येत्या २४ नोव्हेंबरपासून कराड येथे सुरू होणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनातही 'राधा'ला सहभागी करण्यात येणार असल्याचा अनिकेत बोराटे यांचा मानस आहे.
कृषी प्रदर्शनातील 'राधा'च्या उपस्थिती बरोबरच २४ जानेवारी २०२५ रोजी 'राधा'ची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद झाली. परभणी येथील कृषी प्रदर्शनानंतर अनिकेत यांनी 'राधा'च्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. शरद थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी १२ सप्टेंबर २०२५ ला 'राधा'ची पाहणी करून अहवाल पाठवला. २० सप्टेंबरला यासाठीची संबंधित कागदपत्रे सादर केली. त्यानंतर 'राधा'ची जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.
राधाचे वैशिष्ट्य
जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस
उंची - ८३.८ सेमी (२ फूट ८ इंच)