कराड : सन २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून रोजी संपली आहे. मात्र, मुदत उलटूनही सातारा जिल्ह्यातील अनेक शासकीय वाहनांवर अद्याप जुन्याच नंबर प्लेट असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जिल्ह्यातील तब्बल ३७ शासकीय कार्यालयांना नोटिसा बजावल्या आहेत.
नियमांचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई का करू नये, अशी विचारणा करत संबंधित कार्यालयांना तातडीने ऑनलाइन नोंदणी करून वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच किती वाहनांना एचएसआरपी बसविण्यात आली, किती वाहनांची प्रक्रिया सुरू आहे आणि किती वाहने अद्याप प्रलंबित आहेत, याची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
सामान्य वाहनधारकांच्या वाहनांवर एचएसआरपी नसल्यास आरटीओ आणि पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र, शासकीय विभागांचीच वाहने नियमांचे उल्लंघन करत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शासकीय यंत्रणांनी स्वतः नियमांचे पालन करून आदर्श निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सरकारी वाहनांना मोकळीक?
एचएसआरपी नसलेल्या खासगी वाहनांवर कारवाई केली जात असेल, तर नियम सर्वांसाठी समान ठेवून शासकीय वाहनांवरही तत्काळ कारवाई करावी. केवळ नोटीस न बजावता प्रत्यक्ष कारवाई करून दाखविल्यास आरटीओ आणि पोलिसांवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कारवाई होणारच!
एचएसआरपी बसविण्याची अंतिम मुदत ३० जून होती. त्यानंतर एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच सातारा व कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या भरारी पथकांकडून आणि पोलिसांकडून नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत सुमारे ३६५ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे शासकीय असो वा खासगी, एचएसआरपी नसलेल्या प्रत्येक वाहनावर कारवाई केली जाईल.