महाराष्ट्र

राज्यभरात सावरकर यांच्या कार्याची महती सांगणारी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार - मुख्यमंत्री

प्रतिनिधी

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सातत्याने अपमान करत आहेत. महाराष्ट्रातील जनता सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही. राहुल गांधी यांचा निषेध आणि निंदा करावी तितकी थोडीच आहे. राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन तर करण्यात येणारच आहे, पण त्याचसोबत संपूर्ण राज्यभरात सावरकर यांच्या कार्याची महती सांगणारी सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी जाहीर केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जशी मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडात मारली, तशी मारण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांच्या बाजूने काही प्रमाणात सहानुभूतीचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच सावरकरांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची देखील महाविकास आघाडीत कोंडी होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. सावरकरांचा अवमान कदापि सहन करणार नाही. राहुल गांधी यांचा निषेध व निंदा करावी तितकी थोडीच असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असा पोकळ दम उद्धव ठाकरे यांनी सभेत दिला. अधिवेशन काळात दोन वेळा राहुल गांधी यांनी सावरकर यांना अपमानित करण्याची भूमिका घेतली आणि त्यावर उद्धव ठाकरे तसेच त्यांच्या आमदारांनी मौन पाळणेच पसंत केले. चकार शब्द उच्चारला नाही. बाळासाहेब असते तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जोडे तर मारले असतेच, पण निमूटपणे सहन करणाऱ्यांना पण जोडे मारले असते. राहुल गांधी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली असताना त्यांचा अत्यंत हिरिरीने बचाव करताना मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे आमदार दिसून आले. असे करताना त्यांना सावरकर यांचा अपमान दिसला नाही. हा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू होता,’’ असेही ते म्हणाले.

शिंदे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांचा राज्यभरात निषेध तर करण्यात येईलच, पण त्याचसोबत राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढण्यात येतील.’’ ‘‘शिवसेना-भाजप युती प्रत्येक जिल्ह्यात, विधानसभा मतदारसंघात राहुल गांधींचा निषेध करेल व सावरकर गौरव यात्रा काढेल. सावरकरांचे कार्य समाजापुढे आणून त्यांचा गौरव करू, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त