मुंबई : राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी विरोधी पक्ष महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्याने राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे दुपारी ३ वाजता राज्यसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.
विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता राज्यसभेची एक जागा विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वाट्याला येणार होती. त्यामुळे या एका जागेवरून आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या तिन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात विलीनीकरणाची चर्चा सुरु झाल्याने काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट पवारांच्या नावाला फारसे अनुकूल नव्हते. त्यामुळे आघाडीत सातव्या जागेवरून गोंधळ होता.
राज्यसभेची सातवी जागा राष्ट्रवादीला मिळावी, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मंगळवारी त्यांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली. काँग्रेस आणि ठाकरे गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला समर्थन देण्याची भूमिका घेतल्यानंतर शरद पवार यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी संयुक्त पत्रकार परिषदेत राज्यसभा निवडणुकीत शरद पवार हे आघाडीचे उमेदवार असतील, अशी घोषणा केली. शरद पवार यांच्या उमेदवारीमुळे भाजप महायुतीकडून सातवा उमेदवार दिला जाण्याची शक्यता मावळल्याने राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
शरद पवार तिसऱ्यांदा राज्यसभेत
काही दिवसांपूर्वी संसदीय राजकारणाची ६० वर्षे पूर्ण केलेले शरद पवार हे तिसऱ्यांदा राज्यसभेत जाणार आहेत. २००९ मध्ये शेवटची लोकसभा निवडणूक लढल्यानंतर शरद पवार यांनी २०१४ मध्ये राज्यसभेवर जाणे पसंत केले होते. २०१४ ते २०२० आणि २०२० ते २०२६ अशी सलग १२ वर्षे पवार हे राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत.