रत्नागिरी : खऱ्या अर्थाने कोकणात चांगले कार्यकर्ते शिवसेनेत आले. राजन साळवी अडीच वर्षांपूर्वी यायला पाहिजे होते, पण अखेर ते शिवसेनेत परतले. तुम्हाला लोक का सोडून जात आहेत, त्याचे आत्मचिंतन करा! यांच्या पाठीमागे कोणीच उरले नाही. आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका. होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली तुमची महाराष्ट्रविरोधी आघाडी आणि सुरू झाली विकासाची आघाडी, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वतीने कोकणातील रत्नागिरी येथे झालेल्या आभार सोहळ्यात कोकणवासीयांचे आभार मानले. यावेळी माजी आमदार सुभाष बने, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, पराग बने तसेच माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे गटाचे एकेक शिलेदार एकापाठोपाठ शिंदे गटात जाऊ लागल्याने कोकणात खऱ्या अर्थाने ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माझ्या शिलेदारांना निवडून द्या, मी पुन्हा येईन, असा शब्द दिला होता. त्याप्रमाणे आज मी तुमच्यासमोर शब्द पाळायला आलो आहे. मी दिलेला शब्द पाळणारा आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी कोकणवासीयांसमोर आपले ऋण व्यक्त केले. बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केले. आता तुम्ही शिवसेनेवर प्रेम केले. ९ पैकी ८ आमदार देदीप्यमान विजय मिळवून दिलेत, त्याबद्दल आभार मानण्यासाठी आज मी उभा आहे. एकही आमदार निवडून येणार नाही असे म्हणणाऱ्यांची बोलती महाराष्ट्राने बंद केली, अशा शब्दांतही त्यांनी ठाकरेंचा समाचार घेतला.
माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अनेक योजना राबवल्यामुळे माझी महाराष्ट्राला ओळख झाली. त्यापैकी लाडक्या बहिणींनी दिलेली लाडक्या भावाची ओळख माझ्यासाठी खूप मोठी आहे. आता कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना मी बंद होऊ देणार नाही. अभ्यास करूनच या योजना आणल्या आहेत, त्या बंद होणार नाहीत, असा शब्दही त्यांनी दिला.
“मोगलांना जसे संताजी आणि धनाजी दिसायचे तसे तुम्हाला एकनाथ शिंदे पाण्यात दिसतो. माझ्यावर कितीही आरोप करा, कितीही शिव्या द्या. परंतु या एकनाथ शिंदेच्या मागे माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडके शेतकरी आहेत. तोपर्यंत मला कसलीही चिंती नाही. मी कोणालाही घाबरत नाही,” अशा शब्दांत त्यांनी ठाकरेंना आवाहनही केले.
या आभार सभेत मंत्री योगेश कदम, पालकमंत्री उदय सामंत, रामदास कदम आदींची भाषणे झाली. यावेळी आमदार किरण सामंत, आमदार निलेश राणे, माजी आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण तसेच पक्ष संघटनात्मक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. “नवी दिल्लीत महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मला मराठी माणसाच्याच हस्ते मिळाला. माझ्यावर टीका करा, शिव्या द्या. पण तुम्ही महादजी शिंदे, साहित्यिकांना दलाल म्हणत अपमान करता. जनाची नाही, पण मनाची लाज बाळगा. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही, पण सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झाला आहे,” असेही शिंदे म्हणाले.
सुंभ जळाला, पण पिळ जात नाही
सत्ता येते-जाते, पदे वर-खाली होतात. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, नाव गेले की पुन्हा येत नाही. माझ्या रक्तातील शेवटचा थेंब असेपर्यंत महाराष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करायचे आहे. या महाराष्ट्राने तुम्हाला घरी बसवले. तरीही त्यांना कळत नाही. ‘सुंभ जळाला, पण पिळ जात नाही’ अशी यांची अवस्था आहे, अशा शब्दांत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले.
...तर ठाकरेंना देश सोडावा लागेल - रामदास कदम
शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धवनी केले. जे शिवसेनाप्रमुखांनी कमावले, ते सर्व उद्धव ठाकरे यांनी गमावले. उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले नसते, तर शिवसेना देखील फुटली नसती. ‘आम्ही जर तोंड उघडले, तर उद्धव ठाकरेंना हा देश सोडून जावे लागेल’, अशा शब्दांत रामदास कदम यांनी ठाकरेंवर प्रहार केला.