शिर्डी : 'याची देही याची डोळा ऐसा अनुभवला शिर्डी परिक्रमेचा सोहळा' असा सुखद अनुभव शिर्डीत पार पडलेल्या शिर्डी परिक्रमा महोत्सवात साईभक्तांनी व्यक्त केला. साईसंस्थानच्या प्रमुख पाच उत्सवाबरोबरच आता शिर्डी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शिर्डी परिक्रमा या सहाव्या उत्सवाची भर पडली आहे. या अभुतपुर्व सोहळ्यात देशविदेशातील हजारोंच्या संख्येने साईभक्त सहभागी झाले असल्याचे पहावयास मिळाले.
जगाला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या शिर्डी येथील श्री साईबाबांच्या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक तिर्थक्षेत्र असून याच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी नगरी श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. बुधवारी, १३ फेब्रुवारी रोजी साईबाबा संस्थानच्या स्थापनेला १०२ वर्षे पूर्ण झाली आहेत. श्रीराम नवमी, गुरुपौर्णिमा, गोकुळाष्टमी विजयादशमी, दिपावली आदी प्रमुख उत्सव श्री साईबाबांच्या हयातीपासून आजतागायत सुरू आहे. या पाच उत्सवांसाठी जगभरातून लाखो भाविक साईचरणी नतमस्तक होत असतात. परंतु आता साईबाबा संस्थानच्या या प्रमुख पाच उत्सवांमध्ये मागील चार वर्षांपासून शिर्डी ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शिर्डी परिक्रमा या नवीन उत्सवाची भर पडली आहे. १३ फेब्रुवारी १९२२ हा साईसंस्थान स्थापना दिन असल्याने या दिनाचे औचित्य साधून शिर्डी शहरातील ग्रिन एन क्लिन शिडीं फाऊंडेशन तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने मागील चार वर्षांपासून शिर्डी परिक्रमा उत्सव सुरू करण्यात आला आहे.
यंदाचे हे पाचवे वर्ष असून, बुधवार १३ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता आओ साई खंडोबा मंदिरापासून सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज, महंत काशिकानंदगीरी महाराज, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, माजी विश्वस्त सचिन तांबे, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी मध्यप्रदेशातील रतलाम येथील पुजारी व झाकी, फिरत्या वाहनांवर प्रात्यक्षिक करणारे पथक, बिड तसेच नागपूर येथील साईरथ याबरोबरच बाराणसी येथील डमरू पथक विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या परिक्रमेसाठी देशविदेशातून पन्नास हजार भाविकांनी हजेरी लावून १४ किमी अंतर असलेली शिर्डी परिक्रमा पूर्ण केली.