मुंबई : सिंधुदुर्ग मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ८ ते १० महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. १० महिन्यांत महाराजांचा पुतळा कोसळला हे दुर्दैवी आहे. आमचं आणि साऱ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. महाराजांचा असा अपमान करणाऱ्या शिंदे राजवटीला आणि भाजपा नावाच्या विषारी सापाला आता चेचायलाच हवं, असा संताप युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईत बनवलेलं आणि मोदीजींच्या हस्ते उद्घाटन झालेलं छत्रपती शिवरायांचं मालवण इथलं स्मारक सोमवारी केवळ ८ महिन्यांतच कोसळले. शिंदे सरकारची कंत्राटदार धार्जिणी राजवट याला कारणीभूत आहेच, पण त्याहूनही घातक अशी भाजपची मानसिकता कारणीभूत आहे. आम्ही काहीही करू आणि त्यातून बिनधास्त सुटू, असा अहंकार त्यांच्यात आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून भाजपवरील केला आहे.
भ्रष्ट कारभार अखेर चव्हाट्यावर - वडेट्टीवार
शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आजही भक्कम आहेत. पण २०२३ मध्ये सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात देखील पैसे खाल्ले यासारखे दुर्दैव नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर आसूड ओढले आहेत. टक्केवारीत अडकलेल्या सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे हे लाजिरवाणे उदाहरण असून या घटनेची चोकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
सखोल चौकशी करा - राऊत
हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा अवमान निसर्ग निर्मित किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेला नसून तो महाराष्ट्र शासन निर्मितीत आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पोलीस फौजदारी कारवाई करावी आणि ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण केंद्रीय गृहमंत्री यांनी द्यावेत, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.
संबंधितांवर कारवाई करा - सुळे
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे वर्षभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा सोमवारी दुपारी अचानक कोसळला. एक वर्ष पूर्ण होण्याआधीच पुतळा कोसळल्याने याचे काम घाईघाईत करण्यात आले होते. तसेच ते निकृष्ट दर्जाचे होते, हे स्पष्ट होते. त्यामुळे या घटनेने विविध राजकीय पक्षांनी आणि शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित कंत्राटदार आणि त्याच्या संस्थांना काळ्या यादीत टाका, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नाक घासून माफी मागा - जनता दल
अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी उभारलेला, पंतप्रधानांनी उद्घाटन केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज ढासळला. शिवछत्रपतींनी समुद्रामध्ये बांधलेले जलदुर्ग वादळवाऱ्यांना आणि लाटांच्या तडाख्याना तोंड देत साडेतीनशे वर्ष झाली तरी भक्कमपणे उभे आहेत. आणि अवघ्या नऊ महिन्यांपूर्वीच उभारलेला खुद्द छत्रपतींचाच पुतळा ढासळावा, ही महायुती सरकारच्या दृष्टीने अत्यंत शरमेची गोष्ट आहे. पापक्षालनासाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांनी शिवछत्रपतींच्या समाधीसमोर नाक रगडून राजांची आणि राज्यातील जनतेची माफी मागावी.
सरकारचा पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार : लोंढे
राज्यातील महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचार कुठे कुठे कराल? किमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तरी सोडायचा होता. कमीनखोरीसाठी भाजप सरकारने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनाही सोडले नाही. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे निकृष्ट बांधकाम करून भाजपा सरकारने महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवली आहे, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.