मुंबई : महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान दोन राजकीय गटांमध्ये झालेल्या राडा प्रकरणात माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते श्रीयांश जगताप यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. जगताप यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करीत न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या सुट्टीकालीन एकलपीठाने त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले.
जगताप यांच्याविरोधात महाड शहर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अटकेच्या भीतीपोटी जगताप यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी दाद मागितली होती. त्यांच्या अर्जावर सुट्टीकालीन एकलपीठापुढे सुनावणी झाली. अर्जावरील सुनावणीदरम्यान अतिरिक्त सरकारी वकिलांनी सूचना घेण्यासाठी वेळ मागितला. त्यानंतर पुढील सुनावणी होईपर्यंत जगताप यांना अटक करणार नसल्याची हमी सरकारी वकिलांनी दिली. त्याची नोंद घेत खंडपीठाने ५ जानेवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. २ डिसेंबर रोजी महाड नगरपरिषदेसाठी मतदान सुरू असताना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा झाला होता. त्यावेळी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी एफआयआर दाखल करण्यात आले होते. एका एफआयआरमध्ये शिवसेनेचे आमदार आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले, त्यांचे चुलत भाऊ महेश गोगावले आणि त्यांच्या समर्थकांची नावे आहेत, तर प्रतिस्पर्धी एफआयआरमध्ये जगताप आणि त्यांच्या गटातील सदस्यांची नावे आहेत.