सिंधुदुर्ग : एकीकडे सर्वसामान्यांना मोफत आणि दर्जेदार आरोग्यसेवा देण्याच्या घोषणा करायच्या आणि दुसरीकडे निधीअभावी गरीब रुग्णांचे जीव धोक्यात घालायचे, असा अजब कारभार सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू आहे.
शासनाकडून देणी थकल्याचे कारण पुढे करत 'महा डायलिसिस' योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली पाचही 'डायलिसिस' केंद्रे बंद करण्यात आली आहेत. वैभववाडी, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग आणि फोंडाघाट येथील केंद्रांना टाळे लागल्याने किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांवर मोठे संकट कोसळले आहे. उपचारांसाठी आता ३० ते ४० किलोमीटरची पायपीट करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
वैभववाडी रुग्णालयातील प्रकार ग्रामीण तर संतापजनक आहे. येथे दररोज चार ते पाच रुग्ण 'डायलिसिस'साठी येतात. केंद्र बंद झाल्याच्या दिवशीही पाच रुग्ण उपचाराच्या अपेक्षेने रुग्णालयात पोहोचले. मात्र, सेवा बंद झाल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. काही रुग्णांना अश्रू अनावर झाले.
जगण्यासाठी आवश्यक असलेले उपचार अचानक बंद झाल्याने या रुग्णांनी आता जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'डायलीसिस' सेवा सुरूच राहणार आहे. कारण ही सेवा रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक आहे. रुग्णांच्या सेवेसाठी आवश्यक औषधे व इतर साहित्य पुरवठा मुबलक उपलब्ध करुन द्या. तसेच ही सेवा पुरविणाऱ्या मे. एचएलएल लाईफ केअर लि पुरविणाऱ्या कंपनीची थकीत बिले तत्काळ अदा करा. सेवेअभावी रुग्णांची गैरसोय नको. याबाबतच्या सूचना मी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. ही सेवा विनाखंड सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.नितेश राणे, पालकमंत्री
देणी थकली रुग्ण वाऱ्यावर..!
जिल्ह्यातील ही 'डायलिसिस' केंद्रे चालविण्याची जबाबदारी असलेल्या कंपनीची शासनाकडे मोठ्या प्रमाणात आर्थिक देणी प्रलंबित असल्याने सेवा बंद केल्याचे समजते. एवढेच नव्हे, तर जिल्ह्यातील ४६ प्रयोगशाळा सेवाही बंद करण्याबाबत कंपनीकडून नोटिसा देण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचे संपूर्ण जाळेच संकटात सापडले आहे.
हे तर मृत्यूचे संकट...!
किडनी निकामी झालेल्या रुग्णांसाठी 'डायलिसिस' हा पर्याय नसून जगण्यासाठी आवश्यक असलेला उपचार आहे. अनेक रुग्णांना आठवड्यातून दोन ते तीन वेळा 'डायलिसिस 'करावे लागते. उपचारात खंड पडल्यास शरीरात विषारी घटक आणि अतिरिक्त द्रव साचून गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. जिल्ह्यात ३७ प्राथमिक आरोग्य केंद्रे, सहा ग्रामीण रुग्णालये आणि दोन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांसह एकूण ४६ ठिकाणी प्रयोगशाळा सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, आता आर्थिक देणी थकल्याच्या कारणास्तव या सेवाही बंद होण्याच्या मार्गावर असल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.