महाराष्ट्र

...म्हणून महाराष्ट्रातील निवडणुकीची घोषणा नाही

Swapnil S

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात निवडणूक जाहीर होईल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. मात्र, ती जाहीर न झाल्याने अनेकांचा हिरमोड झाला व यामागे सत्ताधाऱ्यांचे काहीतरी डावपेच असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला जनतेने धोबीपछाड दाखवल्याने जनतेचा हा रोष निवळण्यासाठी आणखी काळ जाऊ द्यावा, असे सत्ताधारी महायुतीला वाटत आहे. तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनांची खैरात जनतेपर्यंत पोहोचल्यास त्याचा आपल्याला निवडणुकीत लाभ होऊन सत्ता टिकवता येऊ शकेल, अशी महायुतीची समीकरणे आहेत, असे बोलले जात आहे.

महायुती सरकारसाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ, अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज या लोकप्रिय घोषणा महत्त्वाच्या आहेत. या योजनांमध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांचा सहभाग नोंदवून पोषक वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रकारावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. राज्य सरकारने एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांना विलंब केला आहे. त्यातच लाडकी बहीणसारख्या घोषणा करून सरकार स्थिती अधिक सुधारण्याचा प्रयत्न करीत असल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे. निवडणुकीची घोषणा करण्यात न आल्याने प्रशासनावर अधिक ताण पडणार आहे, कारण सत्तारूढ आघाडीच्या इशाऱ्यानुसार चालणे त्यांना कठीण जात आहे. जवळपास सर्वच मंत्री आणि आमदार फायली लवकर मंजूर करण्यासाठी आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागांमध्ये खेटे घालत आहेत. आमच्यावर इतका दबाव आहे की, अपूर्ण प्रस्तावही मान्यतेसाठी पुढे आणले जात आहेत. असे प्रस्ताव मंजूर झाल्यास संबंधित अधिकाऱ्याला भविष्यात जबाबदार धरले जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, ‘जम्मू-काश्मीरमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, महाराष्ट्रात धुमधडाक्यात साजरा करण्यात येणारा गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी आदी सणांमुळे महाराष्ट्रातील निवडणुकीचा कार्यक्रम सध्या जाहीर करण्यात आलेला नाही’, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे.

कलम ३७० हटवल्यानतंर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणुका होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या काळात तेथील सर्व उमेदवारांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. परिणामी, सुरक्षा व्यवस्थेवर येणारा ताण लक्षात घेऊन महाराष्ट्रात या काळात निवडणुका घेणे शक्य नसल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.

पाऊस आणि सणांमुळे निवडणुका नंतर घेणार

महाराष्ट्रात अलीकडे मुसळधार पाऊस झाल्याने ‘बीएलओ’ची कामे झालेली नाहीत. तसेच गणेशोत्सव, पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी असे सण, उत्सव पुढील काळात आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून सध्या महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत