सुप्रसिद्ध समाजसेवक प्रकाश आमटे यांना दुर्मीळ ‘हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सर’चे निदान झाले असून, त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना ब्लड कॅन्सरसोबतच न्यूमोनियाच्या संसर्गामुळे गेल्या १० दिवसांपासून खूप तापही आहे. सध्या त्यांच्यावर न्यूमोनियावरील उपचार सुरू असून, येत्या दोन किंवा तीन आठवड्यांनंतर शरीराची ताकद वाढल्यानंतर रक्त कर्करोगावर उपचार सुरू करण्यात येणार आहेत.
केसाळ पेशी ल्युकेमिया हा रक्ताचा एक दुर्मीळ हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. यामध्ये अस्थिमज्जा खूप जास्त म्हणजे अतिरिक्त पांढऱ्या पेशींची निर्मिती (लिम्फोसाइट्स) करते. एरव्ही या पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक पेशी शरीरातील रोगजंतूशी लढतात; पण अतिरिक्त निर्मितीमुळे रोगप्रतिकारक यंत्रणेत त्या तारकऐवजी मारक ठरतात. या अतिरिक्त पांढऱ्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली केसासारख्या दिसतात.
डॉ. प्रकाश आमटे यांना फेब्रुवारी २०२१मध्ये कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. आमटे हे समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत.