सोलापूर : सोलापूरच्या बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने चक्क दोन्ही शिवसेना (एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गट) एकत्र आले आहेत. इतकेच नव्हे, तर त्यांच्यासोबत दोन्ही राष्ट्रवादींनीही हातमिळवणी केल्याने बार्शीत एक 'अजब' महाआघाडी आकाराला आली आहे.
नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकी दरम्यान काही धक्कादायक युती पाहायला मिळाल्या आहेत. अंबरनाथ पालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केली होती, त्यानंतर पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजप विरोधात एकत्र लढताना दिसले. तसेच भाजप आणि 'एमआयएम'चीही छुपी किंवा उघड आघाडी काही ठिकाणी झाली. आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सत्तेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींचे आगळी मैत्री आकाराला आलेली पाहायला मिळत आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महाआघाडी झाल्याचे आपल्या सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केलेल्या एका पत्रकाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या पत्रकात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी बार्शी तालुक्यात शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि मित्रपक्षांच्यावतीने 'महाआघाडी' करण्यात आली आहे.
मशाल आणि धनुष्यबाण एकाच पत्रकावर
या महाआघाडीच्या मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेल्या पत्रकावर शिवसेनेचे 'धनुष्यबाण' आणि 'मशाल' ही दोन्ही चिन्हे शेजारी-शेजारी छापण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, एकाच बॅनरवर उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो एकत्र झळकत आहेत. राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर शत्रू समजले जाणारे हे नेते बार्शीत मात्र 'महाआघाडी'च्या नावाखाली एकत्र आल्याचे चित्र आहे.