सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी परिसरातील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला शनिवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. आगीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. या आगीत प्रसिद्ध उद्योजक हाजी उस्मान मन्सुरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनस मंसुरी, शिफा मंसुरी, युसूफ मन्सुरी यांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासाठी १० तासांपेक्षा जास्त अवधी लागला.
हाजी उस्मान मन्सुरी यांच्या मालकीच्या सेंट्रल टेक्स्टाईल कारखान्यात शेकडो कामगार काम करतात. या कारखान्यात टॉवेलचे उत्पादन केले जाते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सूत, दोरी, रसायन, कागदी पुठ्ठे आदी माल कारखान्यात होता. कारखान्याचे मालक कारखान्याच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहतात. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हाजी उस्मान मन्सुरी यांचा टॉवेल निर्मितीचा व्यवसाय विस्तारला होता. ते चाळीस वर्षांपूर्वी गुजरात राज्यातून सोलापुरात व्यापार करण्यासाठी आले होते. कोरोना लॉकडाउन काळात त्यांनी गरजू लोकांची प्रचंड मदत केली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोलापूर महानगरपालिका आणि एमआयडीसीमधील अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आगीने रौद्र रूप धारण केल्याने अक्कलकोट, पंढरपूर, चिंचवड आणि एनटीपीसी येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवाव्या लागल्या. आगीच्या झळांपासून बचाव करताना अग्निशमन दलाच्या दोन जवानांना किरकोळ दुखापतही झाली. शॉर्टसर्किट किंवा रासायनिक साठ्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.