महाराष्ट्र

Pune Killer Porsche: "पुन्हा 'त्या' गोष्टी आठवल्या, तो मुलगा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात होता..."; सोनाली तनपुरेंची पोस्ट चर्चेत

"कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या...संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी..."

Swapnil S

पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवणाऱ्या पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या १७ वर्षीय मुलाने बाईकवरून जाणाऱ्या अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांना चिरडले. त्यानंतर अल्पवयीन मुलाला काही तासांतच जामीन मंजूर झाल्याने वाढता जनक्षोभ लक्षात घेत राज्य सरकारने कडक कारवाईचे आदेश दिले. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह सात जणांना पोलिसांनी अटक केली. आता, या प्रकरणात आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी केलेली एक सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या, संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता, पण त्या मुलांच्या त्रासामुळे अखेरीस माझ्या मुलाची शाळा बदलावी लागल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वाचा सोनाली तनपुरे यांची पोस्ट जशीच्या तशी

" कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या...संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे. वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली गेली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा निष्पाप बळी गेला. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा."

सोनाली तनपुरे यांनी ही पोस्ट केल्यानंतर नेटकऱ्यांच्या त्याखाली अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तुमच्या सारख्या नगर जिल्ह्यातील मोठ्या कुटुंबावर शाळा बदलायची वेळ येत असेल तर सर्व सामान्य माणसांनी बोलायलाच नको.त्यांचे जीव जाणं स्वाभाविक आहे.ह्या घाणेरड्या मानसिकतेला योग्य ती कायदेशीर शिक्षा झालीच पाहिजे, असे @abhielashhere या वापरकर्त्याने म्हटले आहे. नेटिझन्समध्ये ही पोस्ट चर्चेत आहे.

छ. संभाजीनगरमधून विशाल अग्रवालला अटक

विशाल अग्रवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योगसमूहाचे प्रमुख आहेत. अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३, ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहीत असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हे ‘नॉट रिचेबल’ होते. अखेर त्यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी संध्याकाळी पोलीस आयुक्तालयात आणून तांत्रिकदृष्ट्या अटक करण्यात आली. बुधवारी अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बाल न्याय मंडळाचा निकाल धक्कादायक - फडणवीस

‘हिट अँड रन’ प्रकरणावरून पुणे पोलिसांवर जोरदार टीका होत असतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पुणे पोलिसांची पाठराखण केली आहे. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक आणि आश्चर्यकारक होता, असे वक्तव्य त्यांनी केले. दरम्यान, याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही, पोलीस पुन्हा वरच्या कोर्टात जातील, असे फडणवीस म्हणाले. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी थेट पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आणि त्यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

Satara : पोलीस उपनिरीक्षकाच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या; हातावर लिहिली सुसाइड नोट

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा जोरदार पावसाचा इशारा

भारत बंदुकीच्या धाकावर व्यापार करार करत नाही; व्यापार मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले

IND vs AUS : व्हाइटवॉश टाळण्याचे आव्हान; भारताचा आज ऑस्ट्रेलियाशी तिसरा सामना; विराटच्या कामगिरीवर लक्ष

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात