मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेचा कौल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण, यावर महायुतीची गाडी अडकली आहे. मुख्यमंत्रीपदासह मंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली असली तरी पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री करा, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय नेतृत्वाला दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही घराणेशाहीची परंपरा सुरू राहणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. राज्यातील ६ कोटींहून अधिक मतदारांनी महायुतीला सत्तास्थापनेचा मान दिला. महायुतीला एकहाती सत्ता स्थापन करण्याचा अधिकार जनतेने दिला असला तरी महायुतीत मुख्यमंत्री आणि मंत्रिपदावरच गाडी अडकली आहे.
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून ५ दिवस उलटले तरी अद्याप मुख्यमंत्री कोण, याचा सस्पेन्स संपलेला नाही. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला २०० हून अधिक जागांचे बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मजबूत संख्याबळ असतानाही महायुतीकडून सरकार स्थापनेला दिरंगाई का होते, असा प्रश्न मविआसह जनतेला पडला आहे. त्यात भाजपकडून मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्यात आला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदी-शहांचा निर्णय मान्य असेल, असे सांगून भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केला आहे. मात्र या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय असणार, उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भाजपचे दोन्ही प्रस्ताव शिंदेंनी नाकारले
एकनाथ शिंदे यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद अथवा राज्यात उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर भाजपने दिल्याचे समजते. मात्र, शिंदे यांनी भाजपचे दोन्ही प्रस्ताव नाकारले असून महायुती सरकारचा निमंत्रक म्हणून जबाबदारी द्यावी. तसेच लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांना नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद द्यावे, असा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या वरिष्ठांकडे दिल्याचे सांगण्यात येते.