संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

सुनेत्रा पवारांचा भाजपला दणका; पालकमंत्री होताच पुण्यातील महत्त्वाचे कार्यालय बारामतीला हलवले

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला पहिला झटका दिला आहे. त्यांनी पुण्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक कार्यालय बारामती येथे स्थलांतरित केले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राची सूत्रे पुण्याऐवजी बारामतीच्या हातात गेली आहेत.

Swapnil S

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपला मित्रपक्ष असणाऱ्या भाजपला पहिला झटका दिला आहे. त्यांनी पुण्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उप प्रादेशिक कार्यालय बारामती येथे स्थलांतरित केले आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राची सूत्रे पुण्याऐवजी बारामतीच्या हातात गेली आहेत. या कार्यालयामुळे महायुतीमधील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

उप प्रादेशिक कार्यालय एक भिगवणला

यासंबंधीच्या वृत्तानुसार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे विभागात उप प्रादेशिक कार्यालय १ व २ तथा प्रादेशिक प्रयोगशाळा ही कार्यालये आहेत. पुण्याच्या वाकडेवाडी येथील जोग सेंटरमध्ये ही कार्यालये आहेत. त्यापैकी उप प्रादेशिक कार्यालय एक हे आता बारामती येथील भिगवण रस्त्यावरील यश प्राईम या इमारतीत हलवण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औद्योगिक वसाहती तथा महापालिकेच्या क्षेत्रताील औद्योगिक वसाहतींचे कामकाज पाहिले जाते. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर हा मोठा निर्णय घेऊन भाजपला झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

औद्योगिक प्रश्नांसाठी गाठावी लागेल बारामती

एमआयडीसीच्या भोर, जेजुरी, सासवड, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांसह मालेगाव नगरपंचायतीच्या क्षेत्रात औद्योगिक वसाहती आहेत. या परिसरात तब्बल ५१७२ लहान-मोठे उद्योग आहेत. कुरकुंभ, बारामती, जेजुरी व इंदापूर या ४ एमआयडीसींच्या औद्योगिक वसाहती, तसेच कात्रज, हडपसर, रामटेकडी, पर्वती व कोथरूड औद्योगिक वसाहत या पुणे महापालिकेच्या ५ क्षेत्रांतील औद्योगिक वसाहती आहेत. या ठिकाणी कोणताही प्रश्न निर्माण झाला तर तो सोडवण्यासाठी आता बारामतीचा फेरा मारावा लागणार आहे. एवढेच नाही तर एखादी नवी परवानगी घ्यायची असेल तर पुणे शहरातील नागरिकांना व पुण्यालगतच्या भोर, जेजुरी, सासवड येथील नागरिकांनाही बारामती जवळ करावी लागणार आहे.

निर्णय ९ मार्चला , चर्चा मात्र २० मार्चनंतर

यासंबंधीचा निर्णय ९ मार्च रोजी घेण्यात आला. त्यानंतर २० मार्च रोजी या कार्यालयाचे बारामती येथे स्थलांतर झाल्यानंतर ही बाब चर्चेत आली. मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी यासंबंधीची तक्रार राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी ते म्हणाले, हा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याची गरज होती. तसेच हरकती व सूचना मागवणेही आवश्यक होते. पण त्याची कुणालाही कल्पना न देता हे कार्यालय स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुण्यातील नागरिकांना बारामतीला जाण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही, अशी तक्रार संभूस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे. .

भाजप आमदाराचाही विरोध

दुसरीकडे, भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यांनी हे कार्यालय बारामतीला स्थलांतरित करण्याऐवजी तिथे एखादा स्वतंत्र विभाग सुरू करावा, मी या प्रकरणी मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहिले आहे, असे म्हटले आहे.

Iran vs US-Israel War : ट्रम्प यांचा पुन्हा 'हल्लाबोल'; लवकर शांतता तह करा, अन्यथा, 'उद्ध्वस्त' करू- इराणला इशारा

राज्यात ठिकठिकाणी अवकाळी सरी; पुणे, पिंपरी - चिंचवड, वाशिममध्ये पाऊस; वातावरणात गारवा, पण शेतीचे नुकसान

SIT चौकशीला रुपाली चाकणकरांची दांडी

संभाजीनगरात LPG टंचाई; दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा संप; प्रवाशांचे हाल

'चिपी - मुंबई'साठी सरकार आठ कोटी; कंपनीला तफावत निधी देणार