सुरत : जळगावमधील एकाच कुटुंबातील सहा जणांना गुजरातच्या सुरत जिल्ह्यातील कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पती-पत्नीसह तीन जणांचा मृत्यू झाला असून, दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. तर १३ वर्षीय मुलाने पोहून स्वतःचा जीव वाचवला. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी बारडोली तालुक्यात घडली. या प्रकरणातील संशयित आरोपींची ओळख पटली असून, ते संबंधित कुटुंबाच्या परिचयाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
संबंधित कुटुंब काही कामानिमित्त वाहनाने सुरतला जात होते. त्यावेळी दुसऱ्या वाहनातून त्यांचा पाठलाग करणाऱ्या चार जणांनी बारडोलीतील उवा गावाजवळ त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना दोन वेगवेगळ्या वाहनांमध्ये बसवण्यात आले.
मुलाच्या जबाबानुसार, त्याचे आई-वडील आणि दोन वर्षांच्या भावाला एका वाहनात, तर त्याला, त्याच्या १६ वर्षीय भावाला आणि नऊ वर्षांच्या बहिणीला दुसऱ्या वाहनात बसवण्यात आले. त्यानंतर आरोपींनी सर्वांना कालव्यात फेकल्याचे १३ वर्षीय मुलाने पोलिसांना सांगितले. त्याने पोहून आपला जीव वाचवला आणि रविवारी सकाळी मोठ्या बहिणीशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली.