रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील कोर्लई गावाजवळ रविवारी रात्री किनारपट्टीजवळ एक संशयास्पद बोट दिसली. ही बोट पाकिस्तानची असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत असून, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही बोट कोर्लईच्या रेवदंडा किनाऱ्यापासून सुमारे दोन नॉटिकल मैल अंतरावर सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास आली. या बोटीच्या तपासासाठी सुरक्षा यंत्रणा तात्काळ सज्ज झाल्या. परंतु, सकाळपासून ही बोट आहे त्या ठिकाणाहून गायब झाल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीवरून ही बोट दुसऱ्या देशातील असून वाहत-वाहत महाराष्ट्र किनारपट्टीवर आली असावी, असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे. रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
सदर घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस, तटरक्षक दल, भारतीय नौदल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद पथक (QRT), बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही बोट रिकामी असल्याचे आढळली आहे, परंतु काही व्यक्ती बोटीमधून समुद्रात उतरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रात्रीपासूनच कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली असून वाहनांची आणि व्यक्तींची कसून तपासणी सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे अडथळा -
समुद्रात जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे बोटीपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. पोलीस अधीक्षक दलाल यांनी बार्जच्या मदतीने बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण हवामान प्रतिकूल असल्यामुळे त्यांना परतावे लागले.
बोट रडारवरून गायब, शोधासाठी हेलिकॉप्टरचा वापर होणार
IANS ने दिलेल्या वृत्तानुसार, ही अज्ञात बोट सोमवारी सकाळपासून पुन्हा रडारवर दिसलेली नाही. रायगड पोलिसांनी सखोल तपास करत परिसरात शोध घेतला, मात्र बोट आढळून आली नाही. संशयित बोट समुद्राच्या अधिक खोल भागात गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजपासून बोटीचा शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली जाणार आहे.
ही बोट कोणाच्या मालकीची आहे, ती इथे का आणि कशी आली? याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. या प्रकारामागे दहशतवादी कारवाया असण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क आहेत. तटरक्षक दल आणि भारतीय नौदल समुद्रात शोधमोहीम चालवत आहेत, तर सीमा शुल्क विभाग विदेशी बोटीच्या उपस्थितीमागचं कारण शोधत आहे.
ही बोट कोणाच्या मालकीची आहे, ती इथे का आणि कशी आली? याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. या प्रकारामागे दहशतवादी कारवाया असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या संपूर्ण तपासात आणि सुरक्षा व्यवस्थेत अनेक सुरक्षा यंत्रणांचा सक्रिय सहभाग आहे. रायगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम करीत आहेत. तटरक्षक दल आणि भारतीय नौदल यांनी समुद्रात शोधमोहीम सुरू केली आहे, तर सीमा शुल्क विभाग ही बोट इथे असण्यामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
Quick Response टीमने परिसरात गस्त वाढवली असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी ते सज्ज आहेत. यासोबतच, बॉम्ब शोधक व नाशक पथक बोटीत किंवा परिसरात स्फोटकांचे अस्तित्व तपासत आहेत. स्थानिक गुन्हे शाखा स्वतंत्र तपास करत असून या घटनेमागे कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, याचा शोध घेत आहेत.
या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करत परिसरात पूर्णपणे सुरक्षा व्यवस्था पक्की केली असून नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ही घटना गंभीरपणे तपासली जात आहे आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन कारवाई केली जात आहे.