नागपूर: ‘स्वदेशी’ आणि ‘स्वावलंबनाला’ पर्याय नाही, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूर येथे झालेल्या वार्षिक विजयादशमी सभेत ते बोलत होते. श्रीलंका, बांगलादेश आणि अलीकडे नेपाळमध्ये झालेला सत्ताबदल हा चिंतेचा विषय असल्याचे सांगतानाच, भारतात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्या शक्ती देशाच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे सक्रिय आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मिळालेला आंतरराष्ट्रीय प्रतिसाद भारताच्या जागतिक मैत्रीचे खरे स्वरूप दाखवत असला तरी देशाची सुरक्षा क्षमता वाढवण्याची गरज अधोरेखित करतानाच, जागतिक परस्परावलंबन हे बंधनकारक होऊ नये आणि स्वावलंबनाला पर्याय नाही असे त्यांनी सांगितले.
हिंदू समाज हा ‘वसुधैव कुटुंबकम्’ (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) या महान संकल्पनेचा रक्षक आहे असे सांगतानाच, विविध भाषा, धर्म, जीवनशैली असलेल्या भारतात सामाजिक एकता ही प्रगतीसाठी सर्वांत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताच्या शेजारच्या देशांमध्ये असलेली अस्थिरता सरकार आणि समाज यांच्यातील दुराव्याशी आणि सक्षम प्रशासनाच्या अभावाशी संबंधित आहे.
हिमालयातील परिस्थिती ‘धोक्याची घंटा’, विकास धोरणाचा पुनर्विचार आवश्यक
हिमालयीन प्रदेशात हवामानाशी संबंधित समस्या अधिकच वाढत असतील, तर भारताने आपल्या विकास धोरणांचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भागवत यांनी केले.