ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत  
महाराष्ट्र

ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा सवाल विचारला जात असताना संजय राऊत यांनी केलेलं ट्विट लक्षवेधी ठरतंय.

किशोरी घायवट-उबाळे

राज्यभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली असताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का याबाबत अनेकांकडून विचारले जात असताना आज (दि.२३) यावर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत यांनी सोशल मीडियाद्वारे उत्तर दिले.

"उद्या १२ वाजता" अशी कॅप्शन देत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर करत त्यांनी युतीची शक्यता वर्तवली. या ट्विटची चर्चा होत असताना आता संजय राऊत यांनी पुन्हा एक ट्विट करत नवी माहिती दिली आहे. आधी वेळेची आणि आता ठिकाणाची माहिती त्यांनी पोस्टमार्फत दिली आहे.

उद्या १२ वाजता...

संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मीडिया X प्लॅटफॉर्मवर "उद्या १२ वाजता हॉटेल ब्लू सी वरळी" अशी कॅप्शन देत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये राज आणि उद्धव दोघांच्या हातात पुष्पगुच्छ दिसत आहे. त्यावरून उद्या, बुधवारी (२४ डिसेंबर) दुपारी १२ वाजता ठाकरे बंधू वरळी हॉटेल ब्लू सी याठिकाणी एकत्र येतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

जागावाटपाच्या चर्चा पूर्ण

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले होते की, अनेक शहरांतील जागावाटपाच्या चर्चा पूर्ण झाल्या आहेत. “नाशिकमध्ये चर्चा झाली आहे, पुण्याचा विषय संपवला आहे. कल्याण-डोंबिवलीचा निर्णय झाला आहे. ठाणे आणि मीरा-भाईंदरबाबतही चर्चा झाली आहे. इतक्या महानगरपालिका असल्याने थोडा वेळ लागत आहे, पण आम्ही एकत्र बसून योग्य तो निर्णय घेऊ,” असे त्यांनी सांगितले.

निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन

संजय राऊत यांनी असेही सांगितले की, “कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहे. युतीबाबत आता कोणताही संभ्रम उरलेला नाही. तसे निर्देश कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. मुंबईसह इतर महापालिकांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाले आहे.”

निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंची भेट आणि संभाव्य युती

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटची राजकीय विश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे बंधूंची भेट आणि संभाव्य युती झाल्यास मुंबईसह राज्याच्या राजकारणात मोठे समीकरण बदलू शकते. याशिवाय, मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक अशा महानगरपालिकांसाठीही ठाकरे बंधू एकत्र येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे उद्या १२ वाजता वरळी येथील हॉटेल ब्लू सी याठिकाणी नेमकं काय घडणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

'बॅचलर्सना परवानगी नाही' म्हणत मालकिणीलाच घर खाली करायला सांगितलं; सोसायटी बोर्ड मेंबर्सना २२ वर्षांच्या तरुणीने शिकवला धडा

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीवर सुप्रिया सुळेंचे भाष्य; "ठाकरे बंधू एकत्र आले तर...

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

BCCIचा मोठा निर्णय! महिला खेळाडूही होणार मालामाल; देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ

मोठी बातमी! राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीची उद्या घोषणा होणार? संजय राऊत यांच्या 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण