महाराष्ट्र

पावसामुळे जनजीवन विस्कळीत

ठाणे जिल्हा, रायगड आणि कोकण पट्ट्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजविला असून सतत सुरू असलेल्या कोसळधारेने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Swapnil S

भिवंडी : ठाणे जिल्हा, रायगड आणि कोकण पट्ट्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने हाहाकार माजविला असून सतत सुरू असलेल्या कोसळधारेने लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रविवारची सुट्टी असल्याने नागरिकांनी घरी राहून आनंद घेतल्याने गर्दीच्या ठिकाणी तुरळक नागरिक कामानिमित्त बाहेर निघालेले दिसत होते. हवामान खात्याने भिवंडीला ऑरेंज अलर्ट दिल्यानंतर देखील शहर व ग्रामीण आपत्ती विभागातून अपेक्षित मदत नागरिकांना मिळाली नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. भिवंडी शहरात शनिवारी रात्रीपासून कोसळधार असल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तर अनेक ठिकाणी पाणी जाण्यास मार्ग नसल्याने त्या ठिकाणी पाणी तुंबले होते. नारपोली भागात गटारे साफ न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबल्याची घटना घडली आहे. शहरातील इदगाह रोड आणि काकूबाई चाळ या भागात पाणी साचल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले.

महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाने त्या ठिकाणी रस्सी लावून नागरिकांना घराबाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविले. तर क्रमवारी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीचे पाणी म्हाडा कॉलोनीमधील लोकवस्तीत शिरले तसेच गफूरवस्तीमध्ये शिरले. इदगाह रोड येथे पाणी साचल्यानंतर अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरले. मात्र या ठिकाणी महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाचे कोणीही अधिकारी व कर्मचारी मदतीसाठी आले नसल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. तसेच बंदर मोहल्ला, शिवाजी चौक, अजयनगर, शिवाजीनगर, तीनबत्ती, तानाजीनगर आदी भागात पाणी साचल्याने या भागातील रहिवाशांना घराबाहेर पडता आले नाही. तर निजामपूर आणि इदगा रोड येथे झाड पडल्याच्या घटना घडल्या. शिवाजीनगर ते तीनबत्ती या भागात पाणी साचल्याने रस्त्यावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांचा भाजीपाला पाण्यात वाहून गेल्याने व घाण पाण्यात भाजी भिजल्याने अनेक भाजीपाला विक्रेत्यांचे नुकसान झाले. शहरातील रस्ते नेहमी अडविणाऱ्या रिक्षा रविवारी पावसाच्या संतत धारेमुळे रस्त्यावरच आल्या नाही. सकाळी शहरात वाहनांची रेलचेल होती.

भिवंडीतील गावांचा शहराशी संपर्क तुटला

शहरात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले. तालुक्यातील भिवंडी-पारोळ रोडवरील कांबे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने जुनांदुर्खी, कांबे, टेंभवली, पालीवली, गाणे, फिरिंगपाडा, लाखीवली, चिंबीपाडा, कुहे, आंबरराई, कुहे, खडकी, भुईशेत, माजिवडे, धामणे, वाण्याचा पाडा आदी ग्रामीण भागातील गावांचा भिवंडी शहराशी संपर्क तुटला होता. तसेच शहरातील चाविंद्रा रोड येथे पाणी साचल्याने अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी