महाराष्ट्र

ठाणे, कल्याण, नाशिक शिंदेंकडेच; ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे, नाशिकला गोडसेंना उमेदवारी

गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपात अडचणीच्या बनलेल्या ठाणे, कल्याण आणि नाशिक या तीन जागांचा तिढा अखेर महाराष्ट्र दिनी सुटला आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या जागावाटपात अडचणीच्या बनलेल्या ठाणे, कल्याण आणि नाशिक या तीन जागांचा तिढा अखेर महाराष्ट्र दिनी सुटला आहे. तिन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या वाट्याला गेल्या आहेत. कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्यातून नरेश म्हस्के तर नाशिकमधून हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.

मंगळवारी शिंदे सेनेने मुंबईतील दोन उमेदवार जाहीर केले होते. बुधवारी त्यांनी नाशिक, कल्याण आणि ठाणे मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले. कल्याणमधून महायुतीचे उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच केली होती. याबाबत शिंदे गटाकडून बुधवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपचा दावा होता. या दोन्ही मतदारसंघांत भाजपची ताकद वाढली असल्याचे भाजपचे म्हणणे होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून या मतदारसंघांत भाजपने आपली शक्ती दाखविण्यास सुरूवात केल्याने महायुतीत हे मतदारसंघ तणावाचे ठरले होते. यावरून बरेच राजकारणही झाले. दुसऱ्या बाजूला कल्याण येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा होता. तर ठाणे हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला. स्वत: ते या मतदारसंघातून येतात. ठाणे हा शिवसेनेचा गड मानला जातो. हाच जर हातातून सुटला असता तर मुख्यमंत्री शिंदेंना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले असते. महायुतीमध्ये ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागा मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्याकडेच ठेवण्यात अखेर यश मिळवले आहे.

नरेश म्हस्के शिंदेचे विश्वासू

ठाण्यासाठी प्रताप सरनाईक यांचे नावसुद्धा चर्चेत होते. ते ओवळा-माजीवडा विधानसभेचे आमदार आहेत. पण अखेर उमेदवारीची माळ मुख्यमंत्र्यांचे विश्वासू नरेश म्हस्के यांच्या गळ्यात पडली आहे. नरेश म्हस्के ठाण्याचे महापौरसुद्धा होते. २०१२ पासून ते ठाणे महापालिकेवर सातत्याने निवडून गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्यानंतर म्हस्के हे कायम त्यांच्यासोबत दिसत होते. ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात त्यांचा पुढाकार असतो. ठाण्यात नरेश म्हस्के यांचा सामना महाविकास आघाडीच्या राजन विचारे यांच्याशी होणार आहे. राजन विचारे यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे.

कल्याणमध्येही उमेदवारी जाहीर होण्याआधी शिवसेना-भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच होती. पण अखेर ही जागा शिवसेनेला मिळाली. इथून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे रिंगणात आहेत. त्यांची लढत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्याशी होईल.

नाशिक लोकसभेच्या जागेवरूनही महायुतीत जबरदस्त तणाव होता. या जागेवर शिवसेना शिंदे गटाचाच नाही तर भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचाही दावा होता. हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. त्यांनी अनेकदा ‘वर्षा’ निवासस्थानी येऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली. शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर त्यांना ही उमेदवारी मिळाली.

नाशिकवरून महायुतीत होती जोरदार रस्सीखेच

नाशिकमध्ये स्थानिक पातळीवर भाजपची प्रचंड ताकद वाढली आहे. त्यांचे आमदार, नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिकच्या जागेवर भाजपकडून दावा सांगितला जात होता. छगन भुजबळही नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यांच्या नावाचीही बरीच चर्चा झाली. मात्र, महायुतीत तणाव नको म्हणून छगन भुजबळ यांनी आधीच आपली उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा केली होती. आता अखेर ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली.

Nerul–Mumbai Ferry : फक्त ३० मिनिटांत मुंबई! १५ डिसेंबरपासून नेरुळ-भाऊचा धक्का फेरी सुरू होणार; भाडे किती? जाणून घ्या डिटेल्स

Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

लाज आणली! महिला डॉक्टरांचा स्पर्श व्हावा यासाठी आजारपणाचं नाटक; कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाला अटक

IND vs SA : सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना

परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले