मुंबई : बुलढाणा जिल्ह्यात आढळलेल्या अचानक केस गळतीच्या (अलोपेसिया टोटालिस) घटनांचे कारण स्थानिक रेशन दुकानांमधून पुरवठा झालेल्या पंजाब, हरियाणातील गव्हामध्ये असलेले अधिक प्रमाणातील सेलेनियम असल्याचे एका वैद्यकीय तज्ज्ञांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ दरम्यान बुलढाण्यातील १८ गावांमध्ये एकूण २७९ जणांमध्ये अचानक केस गळतीच्या घटना आढळल्या. त्यामुळे प्रशासनाने याच्या चौकशीचे आदेश दिले. संक्रमित लोकांमध्ये अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणींचा समावेश असून, या आजारामुळे त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीवर तसेच विवाहासंबंधी निर्णयांवर परिणाम झाला. अलोपेसियासोबत असलेल्या सामाजिक कलंकामुळे काहींनी संपूर्ण टक्कल करून घेतले. जेणेकरून त्यांना लाजीरवाण्या परिस्थितीला सामोरे जावे लागू नये. रुग्णांचे नमुने गोळा केल्यानंतर त्यामध्ये डोकेदुखी, ताप, खाज सुटणे, चुरचुरणे आणि काहींना उलटी व जुलाब असे लक्षणे आढळली, असे डॉ. हिंमतराव बावस्कर (बावस्कर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, रायगड) यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बाधित लोकांमध्ये लक्षणे दिसल्यानंतर अवघ्या ३-४ दिवसांत संपूर्ण टक्कल होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. तपासणीत आढळले की, बाधित व्यक्तींच्या रक्त, लघवी, केसांमध्ये सेलेनियमचे प्रमाण अत्याधिक वाढले आहे. रक्तातील सेलेनियमचे प्रमाण ३५ पट, लघवीत ६० पट आणि केसांमध्ये तब्बल १५० पट वाढले होते. यावरून हे प्रकरण अतिरिक्त सेलेनियम सेवनामुळेच झाल्याचे स्पष्ट होते, असे बावस्कर म्हणाले. बाधित लोकांमध्ये झिंक (zinc) चे प्रमाण खूपच कमी होते. अति सेलेनियममुळे पोषणतत्त्वांमध्ये असंतुलन निर्माण होतो.
काय आहे सेलेनियम?
सेलेनियम हा एक खनिज घटक असून तो अधिकतर मातीमध्ये आढळतो आणि नैसर्गिकरीत्या पाण्यात व काही अन्नपदार्थांमध्येही तो अनेकवेळा सापडतो. शरीराच्या चयापचय प्रक्रियेसाठी अत्यल्प प्रमाणात सेलेनियम आवश्यक असते.
साथीचे प्रमुख कारण पंजाब आणि हरियाणातून आयात झालेल्या गव्हात असलेले जास्त सेलेनियम असल्याचे आढळले. आमच्या तपासणीत आढळले की, या भागातील गव्हामध्ये स्थानिक गव्हाच्या तुलनेत ६०० पट अधिक सेलेनियम होते. त्यामुळेच ही समस्या उद्भवली.
- पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. बावस्कर